आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेम करणे वाईट नाही पण कोणावर, का आणि कसे करतो ? हे तपासायला हवे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - प्रेमकरणे वाईट नाही पण ते कोणावर, का आणि कसे करतो हे तपासायला हवे. तसेच मुलींना त्रास देणाऱ्या मजनूंना जागीच ठोकून काढण्याचे सामर्थ्य मुलींमध्ये निर्माण हावे, असा सूर पोलिस आयुक्तालयाकडून गुरुवारी आयोजित जागर तरुणाईचा, सामाजिक बांधिलकी उत्तरदायित्व या कार्यक्रमात बोलताना मार्गदर्शकांच्या बोलण्यातून पुढे आला. शहर पोलिसांकडून आयोजित या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रवीण पोटे, पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, उपमहापौर संध्या टिकले, प्राचार्या स्मिता देशमुख, अॅड. वर्षा देशमुख, प्रा. डॉ. मोना चिमोटे यांनी उपस्थित तरुणी, विद्यार्थी महिलांना मार्गदर्शन केले.


प्रास्ताविकात पोलिस आयुक्त मंडलिक म्हणाले, महिला सुरक्षेसाठी पोलिसांकडून यापुढेही सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहे. स्टंटबाजी करणारे युवक हॉट स्पॉट ज्या ठिकाणी मुले मुली बसले असतात, अशा ठिकाणी आम्ही वारंवार कारवाई करतो. या कारवाई करत असताना अनेकदा मुले, मुली किंवा काही प्रकरणांमध्ये तर त्याच मुलामुलींचे पालक येऊन आम्हाला म्हणतात, ते दोघेही सज्ञान आहे, तुम्ही कशी कारवाई केली. अशावेळी पोलिस निरुत्तर होतात. मात्र तरीही आमच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. त्यामुळे समाजाने सुद्धा पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे. प्रा. मोना चिमोटे म्हणाल्या, काही मुली किंवा मुले सिनेमात दिसणाऱ्या नट्या, मॅगझिनवर असलेले मॉडेलचे छायाचित्र पाहून त्यांचे अनुकरण करतात. वास्तविकता चित्रपटातील नट्या किंवा स्टार मॉडेल यांना प्रचंड सुरक्षा राहते. त्यांच्यापर्यंत सर्वसाधारणपणे कुणी पोहोचू शकत नाही. मात्र त्या नटीसारखे कपडे आपल्याकडील मुलींनी घालण्याचा प्रयत्न केल्यास तिला नटी झाल्यासारखे वाटेल परंतु तिच्या सुरक्षेसाठी आजूबाजूने कोणीही राहत नाही. त्यामुळे आपला पेहराव हा योग्य असायला पाहिजे. आपल्या समाजात अजूनही तेवढी कडक सुरक्षा व्यवस्था नाही. त्यामुळे पोलिसांना दोष देऊन फायदा नाही.

 

प्राचार्या स्मिता देशमुख म्हणाल्या की, मुलींच्या मनात अजूनही भीती आहे. त्या आपल्या मनातील गोष्टी सांगत नाही. मुलींनी या बाबी बोलायला पाहिजे. कायदा, समाज, पोलिस सर्व मुलींच्या बाजूने आहे. त्यामुळे त्यांनी भिण्याचे काही कारण नाही. प्रेम करणे वाईट नाही, मात्र प्रेम करताना आपण कोणावर करतो, का करतो, कसे करतो, प्रेम करण्याचे वय काय, या बाबी आपणच समजून घेतल्या पाहिजे. प्रेम हे स्वत:वरच करायला पाहिजे, त्यामुळे अनेक मुद्दे आपसुकच सुटतात. पोलिसांनी घेतलेला हा कार्यक्रम महत्वाचा आवश्यक आहे. असा कार्यक्रम प्रत्येक महाविद्यालयात व्हायला पाहिजे. समाज वाईट नाही. मात्र काही वाईट प्रवृत्ती असते, त्यांना मात्र उत्तर देण्याची ताकद आपल्या मनगटात ठेवण्याची वेळ आता आली आहे.

 

...तर मुलींनीच मजनूला तेथेच ठोकून काढावे
मुला-मुलींच्याप्रकरणात सर्वात मोठी जबाबदारी मुलीच्या आईची, त्यानंतर वडिलांची शिक्षकांची आहे. मुलींच्या वागण्यात काय बदल होत आहे हे आईच ओळखू शकते. त्यामुळे आईनेच मुलींवर विशेष लक्ष द्यायला पाहिजे. मुलींना त्रास देणाऱ्यांना पोलिस तर धडा शिकवतीलच पण त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्या मजनूला त्याच ठिकाणी ठोकण्याचे सामर्थ्य निर्माण व्हायला पाहिजे.

- प्रवीण पोटे, पालकमंत्री.

 

बातम्या आणखी आहेत...