आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचूक निदानामुळे वाचले 10वीचे वर्ष; सांगितले होते अपेंडीक्स, निघाली आतड्यावरची सूज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चार डाॅक्टरांनी अपेंडीक्सचे निदान करून दहावीच्या परीक्षेच्या तोंडावर शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्यानंतर अंतिम सल्ला देणाऱ्या डाॅक्टरांनी केवळ आतड्यांवर सूज असून अपेंडीक्स नसल्याचे अचूक निदान केल्याने ज्ञानमाता हायस्कूल, कॅम्प येथील १० वा वर्ग इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी श्रेयस सुरेंद्र कराळेचे मुल्यवान वर्ष वाचल्याने श्रेयससह, त्याच्या आई-वडिलांसह शिक्षकांना आनंद झाला आहे. 
 
याद्वारे ज्या चार डाॅक्टरांनी श्रेयसला अपेंडीक्स झाला असून शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता, त्यांच्याबाबत मात्र रोष दिसून येत आहे. जर श्रेयसची खरेच शस्त्रक्रिया झाली असती तर त्याला परीक्षा देता आली असती काय, असा प्रश्न उपस्थित करीत, अनेकांनी गुणी मुलाच्या कारकीर्दीतील महत्त्वाचे वर्ष, परिश्रम वाचल्याची भावना व्यक्त केली आहे. सोबतच डाॅ. अविनाश चाैधरी यांनी विद्यार्थ्याचे वर्ष वाचवल्यामुळे त्यांच्याबद्दल आदर व्यक्त होत आहे. 
 
श्रेयस एक आठवड्यापासून ताप पोटाच्या आजारामुळे एक रुग्णालयात भरती होता. गत आठवड्यात शहरातील तीन ते चार डाॅक्टरांनी सोनोग्राफीद्वारे अपेंडीक्स झाल्याचे निदान करून दोन दिवसांपूर्वी त्याला शस्त्रक्रियेसाठी डाॅ. देशमुख यांच्या रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. रात्री दाखल करून घेतल्यानंतर अंतिम तपासणीत पुन्हा शंका निर्माण झाल्याने उद्या पुन्हा एकदा सोनोग्राफी करू असा निर्णय डाॅक्टरांनी घेतला. या प्रकारामुळे श्रेयसचे आई-वडील हतबल होऊन शाळेत कळवण्यास आले. त्यांची अवस्था बघून शारीरिक शिक्षक शिवदत्त ढवळे यांनी त्यांना डाॅ. अविनाश चौधरी यांचे आजाराबाबत अंतिम मत घेण्यास सुचविले. पालकांनी मार्च रोजी स. १० वाजता डाॅ. चौधरी यांच्याकडे श्रेयसला नेले. रुग्णाला तपासल्यानंतर त्याच्या पोटाचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी त्याला अपेंडीक्स झाला नसून त्याच्या आतड्यांना सूज इन्फेक्शन असल्याचे डाॅक्टरांनी निदान केले. त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

डाॅ. चौधरी यांचे अचूक निदान उपचारामुळे श्रेयस दहावीचा पहिला पेपर आत्मविश्वासाने देऊ शकला. ज्ञानमाता शाळेचे मुख्याध्यापक आरोक्य सामी, शिक्षक, श्रेयसचे आई-वडील नातेवाईकांनी याचे श्रेय डाॅ. चौधरी यांना दिले आहे. तसेच विद्यार्थ्याबद्दल आत्मियता दाखवणाऱ्या डाॅ.चौधरी यांचे अमरावती महानगर शारीरिक शिक्षक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह शिक्षकांनी आभार व्यक्त केले आहे. 
 
आतड्यांना छिद्र सिटीस्कॅनमध्ये दिसले नाही: श्रेयसमाझ्याच रुग्णालयात उपचार घेत असून त्याला माझ्या दवाखान्यात दाखल केल्यानंतर आधी त्याचे सिटी स्कॅन करण्यात आले. त्याद्वारे रुग्णाच्या आतड्यावर सूज इन्फेक्शन असल्याचे निदान झाले. आतड्यांवर छिद्र आढळले नाही. परिणामी अपेंडीक्सच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता वाटली नाही. त्याला योग्य औषधी दिल्यानंतर त्याच्या पोटाचे दुखणे कमी झाले तसेच तापही बरा झाला. त्यामुळे त्याला दहावीचा पेपर देता आला,असे श्रेयसवर उपचार करणारे खापर्डे बगिचा येथील डाॅ. अविनाश चौधरी यांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...