आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर: कुमारी मातांच्या प्रश्नावर अभ्यास, उपाययोजनांसाठी विद्यापीठाची समिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भातील काही तालुक्यांमध्ये कुमारी मातांचा प्रश्न गंभीर असून, त्याचा अभ्यास उपाययोजना सुचवण्यासाठी अमरावती विद्यापीठाची अभ्यास समिती नेमण्यात आल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी नागपुरात बोलताना दिली. 

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमअंतर्गत तक्रार निवारण समित्यांच्या नागपूर विभागाच्या कार्यशाळेसाठी रहाटकर नागपुरात आल्या होत्या. याप्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना रहाटकर यांनी कुमारी मातांच्या प्रश्नांवर अभ्यास उपाययोजना सुचवण्यासाठी अमरावती विद्यापीठाची समिती नेमण्यात आल्याची माहिती दिली. यवतमाळ जिल्ह्यासह चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्येही हा प्रश्न गंभीर बनला असून, या संपूर्ण भागातच सर्वेक्षण करून या समस्येचा अभ्यास उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत.

राज्यात गाजत असलेल्या मंजुळा शेट्ये या महिला कैद्याचा छळ मृत्यूप्रकरण अतिशय गंभीर असून, महिला आयोगाने अतिशय गंभीरपणे या प्रकरणाची दखल घेतल्याचे सांगताना रहाटकर म्हणाल्या की, आयोगाने सेवानिवृत्त न्यायाधीश आनंद निर्गुडे, माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि महिला प्रतिनिधी अंजली देशपांडे या तीन सदस्यांची एसआयटी नेमली असून, त्यांच्या अहवालानंतर या प्रकरणात कारवाईची शिफारस केली जाणार आहे. याशिवाय आयोगाने स्वत:हून याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात कोण दोषी आहेत, यात तपास पूर्ण झाल्यानंतर निष्कर्ष काढता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.अनेक जिल्ह्यांमध्ये निर्भया निधी उपलब्ध होत नसल्याबद्धल आयोगाकडून पाठपुरावा सुरु असल्याचे रहाटकर यांनी उपप्रश्नावर बोलताना सांगितले. 

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. घटनांचे रिपोर्टींगही वाढले आहे, असे सांगताना कामकाजात महिलांचा सहभाग वाढत असल्याने रोज नवी आव्हाने पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले. तुलनेने महाराष्ट्रातील परिस्थिती बरीच चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मिडियाच्या प्रसाराचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसत असून त्याचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत आयोगाच्या वतीने कार्यशाळा अन्य उपक्रमांच्या माध्यमातून किमान दीड लाख स्त्री-पुरुषांना लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, सदस्य नीता ठाकरे. मंगळवारी तक्रार निवारण समित्यांची कार्यशाळा पार पडली. यावेळी समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

आयोगाकडे रोज शंभर तक्रारी 
राज्य महिला आयोगाकडे रोज किमान शंभर तक्रारी येत आहेत. प्रामुख्याने कौटुंबीक हिंसाचाराच्या तक्रारींचे प्रमाण मोठे असून लिव्ह इन रिलेशनशिप, आमिषाला बळी पडण्याच्या तक्रारीही येत आहेत. यासाठी जबाबदारीचे भान निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...