आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान बहिणीच्या शिक्षणासाठी भावाने शिक्षण सोडले, बहिणीने पटकावली तब्बल 7 सुवर्ण, 1 रौप्य पदके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - लहान बहिणीच्या शिक्षणासाठी भावाने शिक्षण सोडले, बहिणीने पटकावली तब्बल सात सुवर्ण, एक रौप्य पदके आपण शिक्षण घेतले तर बहीण शिक्षण पूर्ण करू शकणार नाही म्हणून मोठ्या भावाने लहान बहिणीसाठी बारावीनंतर शिक्षण सोडले. बहिणीच्या शिक्षणासाठी मोलमजुरी करून पै-पैसा कमवला. 
 
बहिणीनेही भावाचा विश्वास आणि परिश्रम सार्थ ठरवत नेटाने शिक्षण घेतले आणि एम. ए. मराठीत तिने कुलपतींच्या सुवर्णपदकासह तब्बल सात सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले. ही कथा आहे अमरावती तालुक्यातील खानापूर (थुगाव) च्या प्रज्ञा रविंद्र सरोदे या गुणवान सुवर्णकन्येची. 
 
प्रज्ञा ही अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाचीच विद्यार्थिनी. आर्थिक स्थिती बेताचीच. आई, वडील, दोन भाऊ असा कुटुंबकबिला. दोन एकर कोरडवाहू शेती कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचे साधन. पण तेही बेभरवशाचे. मात्र मोठ्या भावाने मोलमजुरी करून प्रज्ञाला शिकवले. खानापूर (थुगाव) हे साडेचारशे ते पाचशे लोकसंख्येचे गाव. या गावात अजूनही एसटी बस येत नाही. प्रज्ञा या गावातील पहिलीच पोस्ट ग्रॅज्युएट. प्रज्ञाने सांगितले की,‘सचिन हा माझा मोठा भाऊ. तो मी सोबतच बारावीला होतो. तो माझ्यापेक्षाही अभ्यासात हुशार. मात्र आपण शिकलो तर माझे शिक्षण होणार नाही, ही बाब दादाला माहीत होती म्हणून त्याने बारावीपासून शिक्षण सोडले आणि स्वत: मजुरी करायला लागला. त्याच्याच पैशाने मी आतापर्यंत शिक्षण घेत आले आहे.’ प्रज्ञाचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर नांदगावपेठला रिक्षाने ये-जा करणे परवडत नाही म्हणून तिला वसतिगृहात राहून शिकावे लागले. मी सुवर्णपदक प्राप्त करेल, असा विश्वास दादाचा होता, तो सार्थ ठरवल्याचा आनंद आहे, असे प्रज्ञा सांगते. 
 
अाज दीक्षांत समारंभात गाैरव 
प्रज्ञाला मंगळवारी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुवर्णपदक, कुलपतींचे सुवर्णपदक, डॉ. व्ही. बी. उपाख्य भाऊसाहेब कोलते सुवर्णपदक, श्रीमती शांताबाई लोंढे सुवर्णपदक, श्रीराम शेळके सुवर्णपदक, साहित्यिक स्व. दि. वि. जोशी स्मृती सुवर्णपदक, प्राचार्य श्रीहरी गायकवाड सुवर्णपदक ही सात सुवर्णपदके आणि कविश्रेष्ठ सुरेश भट रोख पारितोषिक तसेच रु. एक हजार किंमतीची पुस्तके प्रदान करण्यात येणार आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...