आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस उत्पादन वाढीसाठी अॅमिनो अॅसिडचा यशस्वी प्रयोग, एकरी दोन ते चार क्विंटलची वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - कापूस उत्पादन वाढीसाठी केसांपासून निर्मित अॅमिनो अॅसिडचा प्रयोग यशस्वी झाला असून त्यावर नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने शिक्कामोर्तब केले आहे. लवकरच हा प्रयोग राष्ट्रीय स्तरावर नेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. केशव क्रांती यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. केसांपासून अॅमिनो अॅसीड निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान वर्धा येथील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकिकरण या संस्थेने विकसित केले. 

संस्थेचे संचालक डाॅ. पी. बी. काळे यांच्याशी संपर्क साधला असता अॅमिनो अॅसिडच्या फवारणीमुळे कापूस उत्पादनात २५ टक्के वाढ झाल्याचे सांगितले. आम्ही वर्धा जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांकडे प्रयोग केले. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. परंतु आम्हाला अधिकृत शिक्कामोर्तब हवे होते. म्हणून केंद्रीय कापूस संशोधन संस्थेशी २०१६ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. सीआयसीआरने वर्षभर त्यांच्या प्लाॅटवर प्रयोग केले. त्यात आमच्या यशावर शिक्कामोर्तब झाल्याचे डाॅ. काळे यांनी सांगितले.
 
सोमवारी दिल्लीला जाणार
येत्या सोमवार ६ मार्च रोजी सीआयसीआरचा अहवाल घेऊन दिल्लीला जाणार आहो. तेथे लघु सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्रालयाचे मंत्री कलराज मिश्र तसेच कृषी मंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन अहवाल सादर करणार असल्याचे डाॅ. काळे यांनी सांगितले. एक किलो केसांपासून तीन ते साडेतीन लिटर अॅमिनो अॅसिड तयार होते. त्याची उत्पादन किंमत ११० ते १२० रूपये असून बाजारात २५० ते ३०० रूपयाला उपलब्ध आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अॅमिनो अॅसिड ६०० ते ७०० रूपये लिटरला मिळते. संत्रा, मूग व हळदीच्या उत्पादनातही अॅमिनो अॅसिडच्या उपयोगामुळे चांगली वाढ झाल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.
 
एकरी दोन ते चार किलो वाढ
एका एकरासाठी एक लिटर अॅसिडच्या तीन फवारण्या कराव्या लागतात. त्याचा खर्च ३०० रूपये येतो. आमच्या परीक्षणात कापुस उत्पादनात एकरी दोन ते चार किलो वाढ स्पष्टपणे दिसून आली, अशी माहिती सीआयसीआरच्या पीक उत्पादन विभागाचे प्रमुख ब्लेझ डिसुझा यांनी दिली. कापसाला फुले येण्याच्या वेळेस पंधरा पंधरा दिवसांच्या अंतराने अॅमिनो अॅसिडची फवारणी केली. १५ लिटर पाण्यात १० मिलिलिटर अॅमिनो अॅसिड मिसळावे लागते, असे डिसुझा म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...