आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्ष उलटूनही मेळघाटातील ‘सुमन’ दुर्लक्षितच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेळघाट/ अमरावती - “ वो आया था । कुपोषण से बच्ची की मौत कैसी हुई? यह पूछा । मदद देने का बोला । उस रोज के बाद अब तक कोई भी अधिकारी नही आया साहेब। हमारा तो राशन कार्ड भी नही है । मदद दिला दो साहेब...!” हे बोल आहेत मेळघाटातील सुमन संजय जांभेकर या आदिवासी महिलेचे.
देशातील पहिले डिजिटल व्हिलेज करण्यासाठी हरिसाल गावात युद्धपातळीवर हालचाली सुरू असताना दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिलेल्या मेळघाटातील ‘राणा मालूर’ या गावातील ‘सुमन’ अद्यापही मदतीच्याच प्रतीक्षेत आहे. राणा मालूर गावातील दोनवर्षीय चांदनी जांभेकर या चिमुकलीचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्र्यांनी चांदनीच्या आईची (सुमन) तिच्या घरी जाऊन भेट घेतली होती. आस्थेने सुमनच्या कुटुंबाची विचारपूस केली होती. सुमनची परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वतोपरी मदत देण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला एक वर्ष पूर्ण होत आले तरीही राणा मालूर या गावात अधिकाऱ्यांनी ढुंकूंनही पाहिलेले नाही. सुमनला करीना आणि रवीना या दोन मुली आणि समीर नावाचा मुलगा असे तीन अपत्य आहेत. कुटुंबाच्या दैनंदिन गरजा तुटपुंज्या शेतीच्या भरवशावरच आहे. आई वडिलांना एकुलती एक असल्याने सुमन तिच्या वडीलांकडे राणा मालूरला राहते. मुख्यमंत्र्यांच्या मेळघाट दौऱ्याला एक वर्ष उलटले तरीही राणा मालूरमध्ये एकही अधिकारी फिरकलेला नाही. २९ नोव्हेंबर २०१४ ला मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मेळघाटातील मालूर, राणा मालूर, चौराकुंड आणि हरिसाल चार गावांत जनता दरबार घेतले होते. हलगर्जीपणामुळे मेळघाटात शासकीय यंत्रणा पोहोचत नसल्याबद्दल त्यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. याचाच प्रत्यय एक वर्षानंतरही पुन्हा आला आहे.
काहीच सुधारणा झाल्या नाही
गावातील रस्ता दुरूस्त करण्याचे आश्वासन दिले होते. गावात सभागृह बांधून देण्याचेही जनता दरबारात मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र काहीच सुधारणा झाल्या नाही.
-सुंदरलाल चतुरकर, नागरिक राणा मालूर