आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणांच्या भिंतींवर सौरऊर्जा प्रकल्प, १२ धरणांवर १२० मेगावॅट निर्मिती शक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- सिंचन प्रकल्पांचे मातीच्या धरणांचे उतार, खुल्या जागा, कालवे तसेच धरणांतील पाण्यावर सौर पॅनल्सची उभारणी करून राज्यात सौरऊर्जा निर्मितीला चालना देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. तसा प्रस्ताव शासनाला सादर झाला असून त्यात विदर्भातील १२ धरणांवर १२० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीच्या पायलट प्रकल्पाचा समावेश आहे. सौर पॅनल्ससाठी मोठी जागा लागते. पुरेशी स्वस्त व भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असलेली जागा न मिळाल्यास प्रकल्प महागडे ठरतात. त्यामुळे अनेक देशांत उपलब्ध जागा कल्पकतेने वापरून सौर पॅनल्स उभारले जातात. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आर. बी. शुक्ला यांनी विदर्भातील धरणांचा अभ्यास करून पाटबंधारेला प्रस्ताव दिला असून, तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचा त्यांचा दावा आहे. द. कोरिया सरकारच्या कोरियन ट्रेड प्रमोशन असोसिएशनच्या माध्यमातून तेथील प्रकल्पांची त्यांनी अलीकडेच पाहणी केली आहे. शुक्ला म्हणाले की, सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी विदर्भातील धरणे उपयुक्त ठरतात. कारण बहुतांशी धरणे दक्षिणमुखी अाहेत. नेमके हेच वैशिष्ट्य सौर ऊर्जानिर्मितीसाठी फायदेशीर आहे. प्रत्येक धरणाचा अक्षांश, रेखांश लक्षात घेऊन अभ्यास करण्यात आला. सूर्यप्रकाश उपलब्ध होण्याचे तासही (सहा तास) विदर्भात अधिक आहेत. धरणांच्या मातीच्या उतारांवर विशिष्ट दिशेत झुकलेले सौर पॅनल्स सहज उभारता येतात. एरव्ही पॅनल्स उभारण्यासाठी स्टीलचे रॉड्स उभारण्याची गरज येथे नसते. त्यामुळे खर्चात किमान ३० टक्के बचत होईल, असा अंदाज आहे. धरणांना सुरक्षा असल्याने या प्रकल्पांसाठी वेगळ्या सुरक्षेची गरज नाही.

सवलतीसाठी केंद्र तयार : केंद्र सरकार सौर उपकरणांवर ३० टक्के सवलत देण्यास तयार आहे, तर ऊर्जा विभागाने ही वीज ७ रुपये दराने पुढील २५ वर्षांसाठी खरेदीची तयारी दर्शवली अाहे. तथापि, यासंदर्भातील दर वीज नियामक आयोगाला निश्चित करावे लागतील, असेही ते म्हणाले.

‘पीपीपी’चा वापर शक्य :
हे प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारले जाऊ शकतात. त्यामुळे पाटबंधारे विभागाला कुठलीही गुंतवणूक करावी लागणार नाही. कोरियासह अनेक गुंतवणूकदार अशा प्रकल्पांत गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. एक मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पासाठी साडेसहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला, तरी सहा वर्षांत पूर्ण प्रकल्पावरील खर्च वसूल होईल, असा शुक्ला यांचा दावा आहे. जलसंपदा विभागाकडे सध्या विदर्भातील १२ धरणांवर सौर पॅनल बसवून १२० मेगावॉटपर्यंत वीजनिर्मितीचा प्रस्ताव दिला आहे. प्रत्यक्षात पुढील तीन वर्षांत विदर्भात पूर्ण होणारी धरणे पाहता सुमारे १ हजार मेगावॉटपर्यंतची वीजनिर्मिती साध्य होऊ शकते, असेही शुक्ला म्हणाले.

लाटांमधून वीजनिर्मिती :
दक्षिण कोरियातील दौऱ्यात समुद्राच्या लाटांपासून वीजनिर्मितीचाही विषयही मांडला गेला. योग्य उंचीच्या लाटांचे किनारे राज्याला उपलब्ध असल्याने भविष्यात त्याचाही विचार
होऊ शकतो.
पाण्यावर पॅनल्स :
कोरियाप्रमाणे धरणात पाण्यावर तरंगणारे पॅनल्स उभारता येतात. यामुळे बाष्पीभवन टळते. कालव्यांवर तसे होऊ शकते.
जायकवाडीत शक्य : जायकवाडी धरणाच्या भिंतीची लांबी १० कि.मी. असून, उंची ३० मीटर आहे. येथही अशी सौरऊर्जा निर्मिती शक्य आहे.
या धरणांचा विचार
विदर्भातील अप्पर वर्धा, शहानूर, सपन, पूर्णा, लोअर वर्धा, वडगाव, पेंच, दाम, पोथरा, मदन, बोर तसेच वेणा या बारा धरणांवर सुरुवातीला सौर पॅनल्स उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.