आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारविरोधात ‘स्वाभिमानी’चे रणशिंग! शेतकरी बचाव आंदोलनाची अमरावतीतून सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नऊ ऑगस्टला क्रांतिदिनी अमरावती जिल्ह्यातील खानापूर (मेंढी) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयाला घर देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. भाजप सरकारवर नाराज असलेले स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रासपचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे हे नेते या कार्यक्रमातून सरकारविरोधात रणशिंग फुंकणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सरकारविरोधात रणशिंग फुंकण्यासाठी याच दिवशी ‘शेतकरी बचाव आदोलन’ सुरू करण्यात येणार आहे. मशाल पेटवून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. सत्तेत असतानाही राज्य सरकार विरोधातच करण्यात येणाऱ्या या आंदोलनातून महायुतीतील छोट्या घटक पक्षांची धुसफूस स्पष्ट होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते.

मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याचे आश्वासन देऊनही भाजपने आपला शब्द पाळला नाही, असे आधीच घटक पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे. यातही शेतकऱ्यांच्या समस्या, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आदी प्रश्नही लटकलेलेच असल्याने भाजपचे मित्रपक्ष नाराज आहेत.

संपूर्ण राज्यभर हजारावर सभा
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार व हिंमत देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राज्यव्यापी शेतकरी बचाव आंदोलन करण्यात येणार आहे. अमरावतीच्या वरूड तालुक्यातील खानापूर (मेंढी) या गावातून मशाल पेटवून या आंदोलनाला सुरुवात होईल. या आंदोलनात संपूर्ण राज्यभरात एक ते दीड महिन्यात हजाराहून अधिक सभा घेतल्या जाणार आहेत.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना घरकुल देणार
आत्महत्या केलेल्या शिवहरी वामनराव ढोक यांच्या परिवाराला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून व श्रमदानातून घर बांधून दिले आहे. राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत करण्यात आली. यानिमित्ताने ९ ऑगस्टला दुपारी दोन वाजता खानापूर मेंढी येथील ढोक यांच्या घरासमोर कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या घरकुलाला स्वाभिमानी निवास म्हणून नाव देण्यात आले आहे. ते घरकुल या कार्यक्रमाच्या निमित्ताने ढोक कुटुंबाला देण्यात येईल. या कार्यक्रमाला विदर्भातून १० हजारांच्या आसपास शेतकरी उपस्थित राहणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
रविकांत तूपकर तळ ठोकून
या आदोलनाची तयारी अमरावती जिल्ह्यात सुरू झाली आहे. ९ तारखेच्या कार्यक्रमासाठी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष व स्वाभिमानी नेते रविकांत तूपकर हे बुधवारपासूनच अमरावतीत तळ ठोकून असून ते विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रभाव मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात अधिक प्रमाणात दिसून येत असे, मात्र आता स्वाभिमानीने विदर्भात आपली पकड मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे या माध्यमातून दिसून येत आहे. वरूड येथील एका शेतकऱ्याच्या कुटुंबीयाला मदत करण्याच्या निमित्ताने स्वाभिमानीने भाजपला शह देण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येते.

असंतोष कशामुळे? भाजपसोबत आलेल्या स्वाभिमानी, शिवसंग्राम व राष्ट्रीय समाज पक्षाच्या नेत्यांना ‘योग्य न्याय’ देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र, सत्तारूढ होऊन ९ महिने झाले तरी हे मित्रपक्ष मंत्रिपद किंवा महामंडळांपासून वंचित असल्याने त्यांच्यात सरकारविरोधी संताप आहे.
बातम्या आणखी आहेत...