नागपूर - फासावर लटकण्यापूर्वी बुधवारी याकूबने एका अचानक घडलेल्या औटघटकेच्या मुलाखतीत अापला भाऊ सुलेमान मेमनला पत्नी आणि मुलीची काळजी घेण्याची सूचना केली. ‘सुलेमान, भाभी और बच्ची का ख्याल रखना’ हे याकूबच्या तोंडून फुटलेले शेवटचे शब्द होते.
याकूबची ‘डेथ वॉरंट’ रद्द करण्याची मागणी करणारी रिट याचिका फेटाळल्यानंतर अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि महाराष्ट्र तुरुंग विभागाच्या प्रमुख मीरा बोरवणकर यांनी याकूब मेमनला फाशी यॉर्डमधून बाहेर काढण्याचे निर्देश दिले. बुधवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास शिपायांनी याकूबला फाशी यॉर्डमधून काढून तुरुंग अधीक्षक योगेश देसाईच्या कार्यालयासमोर एका खुर्चीत बसविण्यात आले. तुरुंग अधीक्षकाच्या कार्यालयात मीरा बोरवणकर, अधीक्षक योगेश देसाई, औरंगाबादचे तुरुंग उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी बी. एम. काळे उपस्थित होते. या वेळी बोरवणकर यांनी याकूबला त्याच्या डेथ वॉरंटविषयी आणि फाशी देण्यात येण्याविषयी माहिती दिली. त्याचदरम्यान याकूबला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली. दरम्यान, याकूबचा भाऊ सुलेमान, चुलतभाऊ उस्मान आणि वकील अनिल गेडाम हे मुलाखतीचा अर्ज घेऊन आले.
एक शिपाई त्यांचा अर्ज घेऊन अधीक्षक कार्यालयात आला. परंतु फाशी उद्यावर असल्याने त्यांना मुलाखत नाकारण्यात आली. त्यामुळे कारागृह प्रशासनाने सुलेमान, उस्मान आणि अॅड. गेडाम यांना काही कार्यालयीन कामांकरीता अधीक्षक कार्यालयाच्या शेजारी असलेल्या तुरुंगाधिकारी कक्षात बसवले. त्या ठिकाणापासून अधीक्षकांचे कक्ष दहा ते पंधरा पावलांवर आहे. सुलेमान आणि उस्मान तुरुंगाधिका-यांच्या कक्षात असताना याकूब तुरुंग अधीक्षकांच्या कक्षाबाहेर खूर्चीवर बसला होता. त्यावेळी अचानकपणे सुलेमान हा तुरुंगाधिका-यांच्या कक्षाबाहेर पडला असता याकूब त्याला दिसला. सुलेमान हा याकूबच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी तुरुंगाधिका-यांनी त्याला अडविले. तेव्हा याकूबने दूरनच सुलेमानला आवाज दिला आणि ‘भाभी राहीना आणि बच्ची जुबैदा का ख्याल रखना’ असे सांगितले. याकूबच्या तोंडून त्याच्या परिवारासाठी बाहेर पडलेले हे शेवटचे शब्द ठरु शकतील, अशी माहिती कारागृहाच्या वरिष्ठ अधिका-याने दिव्य मराठीशी बोलताना दिली.