तिवसा- ज्याच्या नावातच शूर योद्ध्याचा उल्लेख आहे, तो तानाजी उर्फ रवी बायस्कर याने मल्लखांबाचे कौशल्य आत्मसात करून आतापर्यंत जवळपास तेरा देशांमधील नागरिकांना योगाचे धडे देऊन भारतीय कला सातासमुद्रापार पोहोचून आईवडिलांसह देशाचा नावलौकिक वाढवला आहे. विशेष म्हणजे तानाजीला कुठल्याही खेळाचा वारसा नसताना त्याने साधलेली ही किमया कौतुकास्पद आहे.
तालुक्यातील इनमिन ५० उंबरठ्यांच्या रघुनाथपूर या लहानशा खेडेगावात सामान्य कुटुंबात जन्मलेल्या तानाजीने डेन्मार्क येथे भारताचे प्रतिनिधित्व करून तब्बल तेरा देशांतील नागरिकांना व्यायामाचे धडे देत मोठी गरुडझेप घेतली आहे. लहान वयातच तानाजीने आवड म्हणून कुस्ती, मल्लखांब, दांडपट्टा या खेळांना जवळ केले. गावातच प्राथमिक शिक्षण झालेल्या तानाजीचे एमपीएडपर्यंतचे शिक्षण श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालयात झाले. हव्याप्र मंडळाच्या माध्यमातून त्याने मल्लखांबाच्या अनेक राज्यस्तरीय स्पर्धा गाजवल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने चार वेळा कलरकोटही मिळवला आहे.
खेळाच्याप्रचार-प्रसारासाठी जगभ्रमंती :
गेल्याचार वर्षांपासून मल्लखांबाच्या प्रचार प्रसारासाठी त्याने जगभ्रमंती सुरू केली आहे. तत्पूर्वी त्याने लियाॅविनीया येथे झालेल्या पाचव्या तापीसा वर्ड स्पोर्ट् फॉर ऑल या जागतिक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. त्याचबरोबर पोलंड, जर्मनी, फ्रान्स, युके आदी देशातही तो जाऊन आला आहे.
१३ देशांतील विद्यार्थ्यांना दिले प्रशिक्षण :
ऑगस्टते डिसेंबर या चार महिन्यांमध्ये डेन्मार्क येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये त्याने १३ देशांतील विद्यार्थ्यांना भारतीय व्यायाम क्रीडा प्रकाराचे धडे दिले. तेथेच शिष्यवृत्ती देऊन गौरवण्यात आले.
शासनाने घेतली नाही दखल
तानाजीने निरपेक्ष भावनेने मल्लखांबाला जागतिक पातळीवर नेले. विदेशात त्याच्या कार्याचा गौरव झाला तरी सरकारदरबारी अद्यापही तो बेदखल आहे.
आई-वडीलच माझे गुरू
परिस्थितीनुरूप सोयीसुविधा नसतानाही आई-वडिलांनी दिलेले प्रोत्साहन मला इथपर्यंत घेऊन आले. यातहव्याप्रमंचाही वाटा मोलाचा आहे.
- तानाजी उर्फ रवी बायस्कर