आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण विभागावर बेतणार ‘शेल्फी’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शाळेच्या हजेरी पटावरील बाेगसगिरी रोखण्यासाठी असलेली विद्यार्थ्यांची ‘शेल्फी’ शिक्षण विभागावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधाचा सूर उमटल्याने योजनेवर शिक्षकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. शिवाय विविध शिक्षक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना (९ जानेवारी) निवेदन देण्यात आले. 

शाळेच्या हजेरी पटावरील बोगस विद्यार्थ्यांची संख्या रोखण्यासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ‘सेल्फी वुईथ स्टुंडन्ट’ या योजनेची घोषणा नोव्हेंबर १६ मध्ये केली. या योजनेला सुरुवात होण्यापूर्वीच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

वर्ग ते १२ वी पर्यंतच्या सर्व वर्गात ही योजना आजपासून सुरु करण्याचे निर्देश आले होते. या योजनेचे कार्यान्वयन सरल प्रणालीतून करावयाचे आहे, मात्र त्यासंदर्भात मागदर्शन सूचना शिक्षण विभागाकडून आलेल्या नसल्यामुळे या गोंधळात भर पडली आहे. आधार नंबर लिंक करावयाचा असताना अजून त्याची कोणतीही माहिती शिक्षण विभागाकडून उपलब्ध होत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमवेत सेल्फी काढून तो फोटो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करावा, असे आदेश काढले होते. 

शासनाच्या ज्या सरल वेबसाईटवर हे फोटो अपलोड करावयाचे आहेत त्या प्रणालीमध्येच मुळाच नेटवर्कचे दोष असून त्याचे अद्याप निराकरण करण्यात आले नसल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. या उपक्रमाच्या ट्रायल करताना फोटो अपलोड करताना चक्क एक दिवस गेल्याचा अनुभव शिक्षकांना आला आहे. ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचे कनेक्शनच्या सिग्नलच्या अडचणीसह सर्वात मोठी अडचण आधार कार्डाच्या जोडणीच्या संदर्भात तयार झाली आहे. वर्ग ते १२ वी पर्यंतच्या सर्व मुलांचे आधार कार्ड या सरल प्रणालीला आधी जोडावे लागणार आहेत. याची जोडणी झाल्यानंतर संबंधिताचे फोटो काढल्यानंतर ते या लिकंशी जोडले जाणार आहेत. 

आधार क्रमांक नसेल तर ही जोडणी करणे शक्य होणार नाही. वर्ग ते १२ वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्याचे आधार क्रमांक असतील असे नाही तसेच या मधल्या काळात हे क्रमांक जोडण्याचा वेग पाहता अजून काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सोमवारपासून याची अंमलबजावणी कशी करायची, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. 

अडचणींचा डोंगर : खेडोपाडी नेटवर्क नसल्याने शिक्षकाला ऑनलाइन माहिती भरण्यास शाळा सोडून तालुका किंवा मोठ्या गावात इंटरनेट शोधत बसावे लागते. उरलेल्या दिवसात पंचायत समिती, केंद्र शाळा इथे चकरा माराव्या लागतात. ऑनलाइन उपलब्ध असलेली माहिती कागदावर उतरून द्यावी लागते. सेल्फी अपलोड होत नाही म्हणून शिक्षक इंटरनेट शोधत फिरणार आणि त्या मागे विद्यार्थी शिक्षकांना शोधत फिरणार, अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना शिक्षकांचे निवेदन : पदवीधरमतदार संघाची आचारसंहिता लागू करण्यात आल्याने शिक्षकांच्या बदल्या, समायोजन, नियुक्त्या प्रक्रीया राबविण्यात येऊ नये. मुख्याध्यापक समायोजन प्रक्रियेस स्थगिती देणे यासह ‘शेल्फी’ला विरोध दर्शविणारे निवेदन शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींकडून जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना देण्यात आले. 
सेल्फीविरोधात जिल्हाधिकारी गित्ते यांना निवेदन देताना शिक्षक. 

दूरचा विचार व्हावा 
प्राथमिक शिक्षणात विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत अनेक निरूपयोगी प्रयोग केले जात आहेत. भक्कम प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारायला हवा. राष्ट्रीय उत्पनाच्या खर्च करण्याच्या बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी विशेष करून वाढ करावी. शिक्षणावरच खर्च करावी, थातुरमातुर प्रयोगावर उधळपट्टी करू नये- राजेश सावरकर, प्रसिद्धी प्रमुख, प्राथमिक शिक्षक समिती