आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहराज्यमंत्र्यांची यशस्वी शिष्टाई; शिक्षक संघटनांचे आंदोलन स्थगित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष दूत म्हणून आलेले गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेले विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन अखेर गुरुवारी मागे घेण्यात आले. अनुदानासाठी पात्र ठरलेल्या घोषित शाळांना वीस टक्के अनुदान आणि अनुदानास पात्र ठरलेल्या अघोषित शाळांची यादी घोषित करण्यासाठी प्रयत्न करेन असे दोन ठोस आश्वासन डॉ. पाटील यांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांना दिले. डॉ. पाटील यांच्या या आश्वासनानंतर महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीने हे आंदोलन स्थगित करण्याची घोेषणा केली. वीस टक्के अनुदान घोषित करून राज्य सरकारने यापुढेही जबाबदारी पार पाडण्याचे आश्वासन दिले आहे, असे सांगत शिक्षक संघटनांनी आंदोलन मागे घ्यावे, याकरिता डॉ. पाटील यांनी यशस्वी शिष्टाई केली. या वेळी कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदळे यांच्याशी कोल्हापूर येथे दूरध्वनीवर संपर्क साधून डॉ. रणजित पाटील यांच्यासमक्ष चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वसंमतीने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची घोषणा कृती समितीचे कार्याध्यक्ष सुरेश सिरसाठ, विभागीय अध्यक्ष एस. के. वाहुरवाघ, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके आणि संगीता शिंदे यांनी केली.
डॉ.पाटील आणि खोडके यांच्यात शाब्दिक खटके : तत्पूर्वीआंदोलनकर्त्यांच्या मागण्यांसंदर्भात झालेल्या चर्चेच्या वेळी संजय खोडके यांनी शिक्षकांच्या मागणीवर ठाम राहत तीस कोटी रुपयांचे अनुदान घोषित करावे, अशी मागणी केली. राज्य सरकारच्या आंदोलन स्थगित करण्याच्या प्रस्तावावर संघटनांनी सामूहिकपणे चर्चा करून त्यानंतर निर्णय कळवू, अशी रोखठोक भूमिका संजय खोडके यांनी घेतली होती. या वेळी डॉ. रणजित पाटील आणि संजय खोडके यांच्यात राजकारणाच्या मुद्द्यावरून शाब्दिक खटके उडाले. तर, सरकारने घूमजाव केल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी या वेळी दिला.

१५ दिवसांपासून आंदोलन : अघोषितशाळांची यादी घोषित करण्यासह पात्र शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जूनपासून उपोषण सुरू केले होते. आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर गजानन माळेकर आणि प्रवीण परेकर या दोन शिक्षकांना डॉ. पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी पाजून उपोषण सोडवण्यात आले. या वेळी रमेश चांदूरकर, सुनील पांडे, प्रवीण रघुवंशी, पुंडलिक रहाटे, बाळकृष्ण गावंडे, गोपाल चव्हाण, प्रशांत डवरे आदी शिक्षक उपस्थित होते.

५७ शाळांकरिता पाठपुरावा करू
^अमरावती विभागातील अनुदानास पात्र असलेल्या अघोषित ५७ शाळांना घोषित करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू. शिक्षकांप्रति असलेल्या सर्व जबाबदाऱ्या राज्य सरकार पार पाडेल. डॉ. रणजित पाटील, गृहराज्यमंत्री

बातम्या आणखी आहेत...