आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाचा खेळखंडोबा, आपसातील बदलीतून सेवाज्येष्ठतेचा खेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शिक्षक असलेल्या पती-पत्नीचे एकत्रीकरण करून त्यांना दिलासा मिळावा त्यांच्या कुटुंबियांची होणारी ससेहोलपट थांबून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने काही वर्षांपुर्वी शासनाने शिक्षक पती-पत्नीच्या आंतरजिल्हा बदलीबाबत निर्णय घेतला होता. परंतु जिल्ह्यातील सुमारे साडे चारशे शिक्षक पत्नी-पत्नी नोकरी निमित्त एकप्रकारे विभक्त जीवन जगत असताना अद्यापही त्यांच्या बदल्यांचा तिढा सुटू शकला नाही. न्यायालयीन प्रक्रीया, प्रशासकीय दिरंगाई शासकीय आदेशांच्या विविध अर्थांच्या भोवऱ्यात या बदल्या अडकल्यामुळे या विभक्त असलेल्या पती-पत्नी शिक्षकांचे अद्यापही एकत्रीकरण होऊ शकले नाही. त्यामुळे या शिक्षकांच्या कुटुंबात निर्माण झालेल्या विविध गंभीर समस्यांसह याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचे संबंधित शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.
मेळघाटात मागील १० ते १५ वर्षांपासून सेवा देणाऱ्या शिक्षकांनी अन्यत्र बदलीची मागणी केली आहे. तर पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती प्रशासनाकडून मनमर्जी प्रमाणे करण्यात आल्यात. मेळघाटात कधीच सेवा देणाऱ्या शिक्षकांची यादी देखील मोठी आहे. असे असताना अापसी बदलीतून तालुकाअंतर्गत सेवाज्येष्ठतेचा खेळ शिक्षण विभागात सुरू आहे. मेळघाटात जाण्यास बहुतांश शिक्षकांची ना असल्याने बदलीचे प्रकरण प्रत्येक वर्षी न्यायालयात गेल्याची उदाहरणे आहेत. याचा प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष परिणाम शिक्षणावर होत आहे. शिक्षण विभागात तब्बल ४५० च्या अासपास आंतरजिल्हा बदलीची प्रकरणे प्रलंबित आहे. पती पत्नी वेगवेगळ्या जिल्ह्यात सेवा देत असल्याने अनेक कुटूंब त्रस्त झाले आहेत. अतिरिक्त शिक्षकांचा घोळ संपता संपत नसल्याने पती-पत्नी एकत्रीकरणाचा शासन आदेश देखील पायदळी तुडवल्या जात आहे. आरटीई नुसार संच मान्यता केल्यानंतर शिक्षण विभागाकडून १२ १३ जून रोजी प्रशासकीय आपसी बदली प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र आदिवासी बहुल भागात सर्व शाळांवर कायम शिक्षक मिळावेत म्हणून आदिवासी विद्यार्थी संघटना, संचमान्यतेविरोधात बीएड पदवीधारक शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तर माध्यमिक विभागातील शिक्षकांची संचमान्यता झाल्याने आमदार श्रीकांत देशपांडे यांच्याकडून देखील समायोजन बदली प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला. आमदार देशपांडे यांच्या पत्रावर शासनाने देखील समायोजन बदली प्रक्रियेस स्थगिती दिली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी मिळत नाही, पटसंख्या कमी असल्याने शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. विद्यार्थी मिळावे म्हणून शिक्षकांनी प्रत्यक्ष गावांमध्ये असणे गरजेचे आहे, मात्र शाळा सुरू होण्याच्या तोंडावर जिल्हा परिषदेकडून समायोजन तसेच बदलीची प्रक्रीया राबविण्यात आली. बदली प्रक्रिया राबवण्यासाठी शासनाकडून जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती.

आपसी बदलीचा खेळ : मेळघाटातीलधारणी चिखलदरा हे दोन्ही तालुके जिल्ह्याचा भाग आहे. जिल्हाअंतर्गत बदली करताना तालुक्यातील सेवाज्येष्ठता निदर्शनास घेतली जाते. एकाच तालुक्यात १२ वर्षांचा कालखंड होऊ नये, याची काही चाणाक्ष शिक्षक दक्षता घेतात. एका तालुक्यात दहा वर्ष तर त्यानंतर दुसऱ्या तालुक्यात आपसी बदली करुन घेतात. त्यामुळे प्रशासकीय बदली प्रक्रियेतून हे चाणाक्ष शिक्षक आपोआप गळतात, असा आपसी बदलीचा खेळ सुरू आहे.

जिल्ह्याची सेवाज्येष्ठता हवी : मेळघाटातबदली करताना गैर आदिवासी भागातील शिक्षकांना प्राधान्यक्रम देणे गरजेचे अाहे.

कारणे दाखवा नोटिस
^निवडणुक कक्षातील मतदारांचे अर्ज देशमुख यांना नियमबाह्य उपलब्ध करून दिल्याबद्दल नायब तहसीलदार रमेश इंगोले कनिष्ठ लिपिक यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे. सुरेश बगळे, तहसीलदार

मेळघाटबाबत शासनास पत्र
^मेळघाटातबदली करण्याबाबत आदिवासी क्षेत्र वगळून अन्य तालुके मिळून जिल्ह्याची सेवाज्येष्ठता ग्राह्य धरण्याबाबत शासनास पत्र लिहिणार आहे. शासनाकडून आदेश मिळाल्यास मेळघाटात अनेक वर्ष सेवा देणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळेल. उच्च न्यायालयाचा स्थगनादेश असल्याने बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले नाही. डॉ. श्रीराम पानझडे, शिक्षणाधिकारी(प्राथमिक)

जवळपास ७०० शिक्षक मेळघाटात गेलेच नाही
मेळघाटात कधीच गेलेल्या शिक्षकांची संख्या जिल्हाभरात तब्बल ७०० पेक्षा जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षकांची संख्या साडे सहा हजारांच्या आसपास आहे. या शिक्षकांना मेळघाटात सेवा देण्यासाठी पाठवण्याबाबत तजवीज करणे गरजेचे आहे.

बदलीची शक्यता कमी
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता शाळा सुरू असताना शिक्षकांची बदली प्रक्रिया शक्यतोवर राबवली जात नाही. न्यायालयाचा निकाल शाळा आरंभ झाल्यानंतर लागल्यास शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता कमीच आहे.

२०८ शिक्षक अधांतरी
मेळघाटात मागील १० ते १५ वर्षांपासून जवळपास २०८ शिक्षक सेवारत आहेत. मागील चार-पाच वर्षांपासून या शिक्षकांचा बदलीसाठी लढा सुरू आहे. पण बदलीच्या वेळी काहीतरी अडचण निर्माण होते. त्यामुळे त्यांच्यावर एकप्रकारे अन्यायच होत आहे.