आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल ९८ शिक्षकांचे प्रस्ताव झाले गहाळ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आंतर जिल्हाबदली प्रक्रियेचा नऊ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असला तरी उद्या, गुरुवारी (दि. १३) प्रकाशित होणाऱ्या संबंधित शिक्षकांच्या यादीतून ९८ शिक्षकांचे प्रस्तावच गहाळ झाल्याची बाब समोर आली आहे. यावरून जिल्हा परिषदेच्या ‘डिजीटल’ होऊ पाहणाऱ्या शाळांचा गाडा हाकणाऱ्या शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांना पुन्हा नव्याने प्रस्ताव तयार करण्याची डोकेदुखी सहन करून बदली होईस्तोवर आणखी किती दिवस जिल्हाबाहेर राहावे लागेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील नऊ वर्षांपासून जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे आंतरजिल्हा बदली प्रकरण थंड बस्त्यात पडून होते. आंतरजिल्हा बदली शिक्षकांच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य समन्वयक महेश ठाकरे यांच्या नेतृत्वात बदलीग्रस्त शिक्षकांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुळकर्णी यांनी संबंधित प्रकरण गांभीर्याने घेऊन तडीस नेले आहे. विविध आंदोलनानंतर शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी अद्यावत करण्यासाठी प्रथमच १६ १७ जुलै रोजी शिबिराचे आयोजन करून यादी अद्यावत करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. या शिबिरात प्रतिक्षेत असलेल्या ४५१ शिक्षकांपैकी २५१ शिक्षकांनी आपल्या कागदपत्रांची पुर्तता केली होती . मात्र अनेकांचे प्रस्तावच शिक्षण विभागातून गहाळ झाल्यामुळे अशा शिक्षकांच्या माहिती अभावी यादीचा डाटा तयार करतांना अडचणी येऊ लागल्याने शोधून प्रस्तावही सापडल्याने अखेर ९८ शिक्षकांची स्वतंत्र यादीच शिक्षण विभागाने तयार केली. अखेर एकूण ३३२ आंतरजिल्हा बदली शिक्षकांची प्रवर्गानुसार वर्षनिहाय सेवाजेष्ठता यादी तयार करण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. ही यादी उद्या (दि. १३) रोजी सकाळी १० वाजता प्राथमिक शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. परंतू या प्रक्रियेतील ९८ शिक्षकांचे प्रस्तावच गहाळ झाल्यामुळे अशा शिक्षकांची स्वतंत्र यादी तयार करून या शिक्षकांना मुळ प्रस्तावाची छायांकित प्रत पुन्हा २८ ऑक्टोबर पर्यंत सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या याद्या तयार झाल्या असून, त्या प्रसिद्ध झाल्यावर आता बदली प्रक्रिया सुरु करण्यासाठी शासनाच्या आदेशाची प्रतिक्षा आहे . मुख्याधिकाऱ्यांनी ग्रामविकास विभाग सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवांना प्रहार शिक्षक संघटनेने आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या अंमलबजावणी बाबत केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने मार्गदर्शन मागविले आहे. सद्यस्थितीत रिक्त असणाऱ्या पेसा बिगर पेसा मधील शिक्षक पदांवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने आंतरजिल्हा बदली शिक्षकांना सामावून घेण्याबाबत शासनाकडे मार्गदर्शनाबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्या दृष्टीने येत्या पंधरा दिवसात आमदार बच्चू कडू मंत्रालय स्तरावर बैठकीची मागणी करणार असून या बैठकीनंतर प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत .

शिक्षकांचे प्रस्ताव गहाळ ही बाब गंभीर
^आंतरजिल्हा बदली प्रश्नी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने नेहमीच शिक्षकांची थट्टा केली आहे. सेवाजेष्ठता यादी तयार करतांना ९८ शिक्षकांचे प्रस्तावच कार्यालयातून गहाळ होणे ही बाब शिक्षणाधिकारी एकूणच शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणाचा कळस आहे. संबंधित शिक्षकांच्या बदल्या लवकर झाल्यास पुन्हा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे. महेशठाकरे, अध्यक्ष, आंतरजिल्हा बदली शिक्षक संघटना.
बातम्या आणखी आहेत...