आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञांचे संशाेधनच देशाला सर्व क्षेत्रात शिखरावर नेणार - केंद्रीय मंत्री हंसराज अहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: मंडळातील कार्यशाळेचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, मंत्री गिरीश बापट राज्यमंत्री प्रा. डॉ. रणजित पाटील.
अमरावती - अभियांत्रिकी,तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी संशोधनावर भर द्यायला हवा. त्यांचे संशोधनच देशाला कृषी, वस्त्रोद्योग, क्रीडा, अन्न, औषधनिर्मितीच्या क्षेत्रात शिखरावर नेऊ शकते,असे प्रतिपादन केंद्रीय रसायन, खते मंत्री हंसराज अहीर यांनी केले भारत हा बेरोजगार तरुणांचा देश आहे. त्यांना काम देण्यासाठी संशोधन आणि उद्योगांची आवश्यकता आहे.
यासाठी पंतप्रधान देशात रोजगार आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापुढे तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले दिवस येतील, अशी हमी एचव्हीपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित स्पोर्ट््स अँड एंटरटेनमेन्ट बिझनेस न्यू विस्टास फाॅर इंजिनिअरिंग एज्युकेशन यावरील व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केंद्रीय रसायने खते मंत्री हंसराज अहीर यांनी दिली. आयएसटीई वार्षिक राष्ट्रीय संमेलन आंतरराष्ट्रीय परिषदेंतर्गत आयोजित समारोप समारंभाला केंद्रीय मंत्री अहीर यांच्यासोबतच गृहराज्यमंत्री डाॅ. रणजित पाटीलही उपस्थित होते. त्यांनी विज्ञान तंत्रज्ञानाने गेल्या २५ वर्षांत जगात जे परिवर्तन घडवून आणले यावर प्रकाश टाकला. मनुष्याचे शरीर भौतिक रचना बदलली नाही. मात्र, जर त्यात बिघाड झाला, तर सुधार करणारी साधनं मात्र दरवर्षी बदलत आहेत. डाॅक्टर म्हणून मी या बदलांना स्वीकारत आलो आहे. एचव्हीपीएम प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांनी ही संस्था स्वयंपूर्ण असून देशसेवा करणारे विद्यार्थी, तंत्रज्ञ आणि खेळाडू घडवण्यास कटिबद्ध असून आम्ही जे काही मिळवतो त्यातील बराचसा भाग हा शेतकरी गरजूंनाही देतो, असे अभिमानाने सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर एचव्हीपीएम उपाध्यक्ष डाॅ. एस. व्ही. सावदेकर, अायएसटीईचे अध्यक्ष प्रतापसिंग के. देसाई, जेटीसी, जर्मनीचे व्यवस्थापकीय संचालक राॅल्फ डुंगेफेल्ड, डेन्मार्कच्या क्रीडा अकादमीचे अध्यक्ष डाॅ. फिन बर्ग्रेन, चित्रपट दिग्दर्शक डाॅ. विनोद इंदुरकर, डाॅ. माधुरी चेंडके, डाॅ. श्रीकांत चेंडके, डाॅ. एस. एच. देशपांडे, प्राचार्य डाॅ. ए. बी. मराठे, प्रा. व्ही. डी. वैद्य, डाॅ. एम. ई. शेळके उपस्थित होते.

देशातील तज्ज्ञांचा सत्कार
संमेलनपरिषदेच्या समारोपप्रसंगी देशभरातील तंत्रज्ञान महाविद्यालयातील तज्ज्ञांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच पंचम विदर्भ केसरी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या विदर्भ विभाग सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रा. संजय तीरथकर यांचाही गौरव केला.

तंत्रज्ञान खेळासाठी पूरक
तंत्रज्ञानाच्यामदतीने त्या खेळाची उंची वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जसे जलतरणपटूंचा वेग वाढवण्यासाठी निर्मित पोशाख, जगभरातील फेरारी अॅम्युझमेंट पार्क ही तंत्रज्ञानाचीच देण आहे. अगदी बॅट चेंडू तयार करण्यापासून ते खेळाडूंना शरीर कमावण्यासाठी तंत्रज्ञान मदत करीत असते.
डाॅ. कलामांच्या मते विद्यार्थी हेच मिसाइल : मिसाइलमॅन डाॅ. कलाम हे देशातील विद्यार्थ्यांनाच मिसाइल, असे संबोधत असत. भारतीय युवक हा चमत्कार घडवण्यास सक्षम आहे. आवश्यकता आहे ती त्याच्या प्रतिभेला पैलू पाडण्याची तसेच त्याच्यासाठी देशात संधी उपलब्ध करून देण्याची. यापुढे देशभरातील विद्यापीठात आधी खेळ, मग शिक्षण अशाप्रकारे अभ्यासक्रम ठरवले जातील, असे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...