आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोनमॅरो रजिस्ट्रीची नागपुरात सुरुवात; देशातील पहिला उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- रक्ताच्या कर्करोगासह सिकलसेल, थॅलेसेमियासारख्या आनुवंशिक रक्त आजारांवरील उपचारांस साह्यभूत ठरणाऱ्या बोनमॅरोसाठी दात्यांची नोंदणी आणि वैद्यकीय माहिती ठेवणारी देशातील पहिली बोनमॅरो रजिस्ट्री नागपुरात शनिवारी सुरू झाली. राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद व नाशिक येथेही अशी रजिस्ट्री सुरू केली जाणार आहे.     

राज्य शासन व मुंबईच्या टाटा ट्रस्टच्या संयुक्त उपक्रमातून नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू झालेल्या या देशातील पहिल्या रजिस्ट्रीची सुरुवात शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाली.  यानिमित्ताने राज्यव्यापी बोनमॅरो दात्यांची रजिस्ट्री तयार करण्याच्या राज्यव्यापी जनजागृती मोहिमेची सुरुवातही करण्यात आली. टाटा ट्रस्टच्या मदतीने उभारण्यात आलेल्या नागपुरातील या प्रकल्पात तब्बल एक लाख बोनमॅरो इच्छुक दात्यांची माहिती संकलित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. गरजू रुग्णाच्या रक्ताचे घटक जुळणाऱ्या इच्छुक रक्तदात्यांशी संपर्क साधून बोनमॅरोची उपलब्धता सहजपणे वाढवता येणे शक्य होणार आहे. राज्यात १७ प्रमुख शहरांमध्ये असा प्रकल्प उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात नागपूरसह, मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक येथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, रक्ताचा कर्करोग, सिकलसेल, थॅलेसेमियासह अन्य काही आजारांसाठी रक्तपेशीचे दान देण्यासाठी निरोगी रक्त दात्यांची माहिती संकलित करण्यात येणार आहे.  राज्यात सुमारे चार ते पाच हजार रुग्णांना बोनमॅरोची गरज भासते. त्यासाठी ही रजिस्ट्री मोलाची ठरणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. 
    
नागपुरात सिकलसेल संशोधन केंद्र 
नागपुरातील एकाच भागात सिकलसेलचे ४० हजार रुग्ण आढळतात. त्यामुळे सिकलसेल, थॅलेसेमियासारख्या घातक रक्तविकाराने त्रस्त रुग्णांची संख्या नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोलीत मोठी आहे.त्यामुळे नागपुरात सिकलसेल रुग्णांसाठी २५० खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल व संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. त्यासाठी कामठी मार्गावरील साडेचार एकर जागा निश्चित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

बोनमॅरोचे महत्त्व   
अस्थिमगज (बोनमॅरो) हे हाडांच्या पोकळीतील एक पेशीजाल आहे. त्यात रक्त निर्माण करणऱ्या पेशी असतात. अस्थिमगज निरोगी असते, तेव्हा ते सातत्याने रक्ताची भरपाई करत असते आणि ही क्रिया जिवंत राहण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. सर्व रक्तपेशींची निर्मिती अस्थिमगजात होते. अस्थिमगज हा रक्त मातृक पेशींचा एक उत्तम साठा मानला जातो. कर्करोग वा तत्सम रोगांमध्ये होणारे ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ हे या तत्त्वावर आधारित असतात. मानवी शरीरात एकूण वजनाच्या ४ टक्के अस्थिमगज असते. अस्थिमगजात दररोज सुमारे ५०० अब्ज रक्तपेशींची निर्मिती होत असते. रोगप्रतिकारकतेत अस्थिमगजाचा महत्त्वाची भूमिका असते, यातच पांढऱ्या रक्तपेशींची निर्मिती होत असते. या पेशी सर्व रोगजंतूंशी लढण्याचे काम करतात.
बातम्या आणखी आहेत...