आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्यापूर-कोकर्डा मार्ग झाला बंद; वऱ्हाडी थांबले बाजार समितीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पंधरा दिवसावर आलेल्या लग्नासाठी संपुर्ण परिवाराची धडपड सुरू आहे. त्यासाठीच घरात किराणा आणला होता, लग्नपत्रिका लिहून ठेवल्या होत्या, त्या वाटपाचे काम सुरू होते, घरात सर्वत्र लग्नाची धामधुम तयारी सुरू होती. दरम्यान घरातील सर्व मंडळी बाहेर गेली असताना रविवारी(दि. १०) सायंकाळी अचानकपणे पाऊस आला, या पावसाने क्षणातच गावातून वाहणाऱ्या नाल्याला पूर आला, त्यामुळे आजूबाजूच्या शेतात पाणी साचले. दरम्यान घरात चारही बाजूंनी पाणी झिरपायला लागले, अवघ्या काही तासातच घरात पाण्याचे तळे साचले, त्यामुळे लग्नासाठी खरेदी केलेला किराणा, लग्नपत्रिका सर्वच पाण्यात वाहत गेले.
जिल्ह्यात संततधार पावसाचा जोर अद्यापही कायम असून, तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पेढी नदीचे पात्र फुगले आहे. नदीचे पाणी काही जणांच्या घरात घुसल्याने सोमवारी वलगाव येथील ३५ कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. नया अकोला येथे नाल्याला आलेल्या पुराचे पाणी घरात घुसल्याने ३० कुटुंबांना समाज मंदिरात हलविण्यात आले. पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली. दरम्यान, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे जिल्ह्यात पेरणी झालेल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पाणी तुंबल्याने पिके कुजण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

पेढी नदीचे पाणी घरात घुसल्याने वलगाव येथील ३५ कुटुंबांना येथील जिल्हा परिषद उर्दु शाळेत हलविण्यात आले. नया अकोला येथे नाल्याच्या पुराचे पाणी घरात घुसल्याने ३० कुटुंबांना जिल्हा परिषद शाळेत हलविण्यात आले. थुगाव, दोनद, पर्वतापूर येथील नागरिकांची समाज मंदिरात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथे दोन घरे पुर्णत: तर सहा घरांची पडझड झाली. जावरा येथे नाल्याला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटला. धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव येथए आठ मंगरूळ येथे पाच घरांचे अंशत: नुकसान झाले. तिवसा तालुक्यातील शिवणगाव येथे तीन घरांचे नुकसान झाले. अचलपूर तालुक्यातील कुष्टा येथे नाल्याचे पाणी घरात घुसल्याने आठ कुटुंबांना जिल्हा परिषद शाळेत हलविण्यात आले. मोर्शी तालुक्यातील गणेशपुर येथे देव नदीच्या पात्रात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला.

दुपारनंतरपावसाचा जोर ओसरला
जिल्ह्यात सकाळपासून रिमझिम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. दुपारनंतर मात्र पावसाने उसंत घेतली. पावसामुळे शेतीची काम पुर्णपणे खोळंबली असून अद्यापही मोठ्या प्रमाणात पेरणी शिल्लक आहे. सततच्या पावसामुळे नुकतीच पेरणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतात पाणी तुंबल्यामुळे सोयाबीन, तुर, मुग, उडीदाचे पीक कुजले आहे. तब्बल महिनाभर उशीरा पेरण्या झाल्यानंतर पावसामुळेही मोठ्या प्रमाणात पेरण्या खोळंबल्या आहेत.
संततधारपावसामुळे तालुक्यातील दर्यापूर-कोकर्डा दहिहांडा मार्गे अकोला मार्ग रविवारपासून बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पुराचा संभाव्य धोका ओळखून पालिका प्रशासनाने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशार दिला आहे.
नदीकाठावरील नागरिकांची राहण्याची व्यवस्था शहरातील शाळांमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. इटकी येथील नीलेश शेजे यांचा रविवारी खोलापूर येथे विवाह झाला. सायंकाळी लग्नाची वरात इटकी येथे जाण्यासाठी निघाली. परंतु इटकी मार्गावरील नाल्याला पूर असल्यामुळे रात्री आठ वाजता शेजे यांची वरात दर्यापुरात परत आली. कृउबासचे संचालक गोपाल अरबट यांनी या वऱ्हाड्यांची नवरदेव नवरीची राहण्याची, जेवणाची व्यवस्था बाजार समितीमध्ये केली.त्यामुळे वऱ्हाड्यांनी दर्यापूर कृउबास गजबजली होती.

नयाअकोला येथे पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी सोमवारी िजल्हाधिकाऱ्यांसमवेत तिवसाच्या आमदार अॅड.यशोमती ठाकूरही गेेल्या होत्या.पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले. ते दाखवण्यासाठी गावातील प्रत्येक महिला यशोमती ठाकूर यांना ताई, आधी आमच्या घराची पाहणी करा,असा आग्रह धरून ओढत होत्या. छाया: मनीष जगताप.

‘सैपाकाले चुल नाही रायली’!
आम्ही कोणी घरात नव्हतो, चारही बाजूने पाणी घरात आले. त्यामुळे लग्नासाठी आणलेला किराणा, पत्रिका वाहत गेल्या. तसेच धान्यसुद्धा गेले. इतकेच नाही तर संध्याकाळी सैपाक कराले आमच्या घरात चुलही रायली नाही, असे बेबीबाई सांगत होत्या.
संततधारपावसामुळे येथील चारगड धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले असून, सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे घाटलाडकी-मोर्शी मार्गावरली पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या नदीला थोडाही पूर आल्यास या पुलावरून पाणी वाहून वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.
या पुलाची उंची वाढविण्यात यावी,अशी मागणी वारंवार प्रशासनाकडे करण्यात आली. परंतु त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...