आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

132 वर्षापूर्वी सुरू झाली साहित्य संमेलनातील वादाची परंपरा; म. फुले यांनी नाकारले न्या. रानडे यांचे निमंत्रण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नागपूर- साहित्य संमेलनास सुमारे १३८ वर्षांची परंपरा आहे. १८७८ साली न्या. म. गो. रानडे यांनी या संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळी ते “ग्रंथकार संमेलन’ या नावाने ओळखले जात होते. १८८५ साली दुसऱ्या संमेलनास महात्मा फुले यांना निमंत्रण पाठवले होते. त्यावेळी म. फुले यांनी, शूद्रातिशूद्रांच्या प्रश्नांची चर्चा या संमेलनात नाही म्हणून नकार कळवला होता. त्याचे पडसाद आजच्या काळातही उमटत असतात. अाता हिवरा आश्रम येथे प्रस्तावित ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य  संमेलनही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.  
 
राजकारण्यांच्या वावराला आक्षेप 
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरील राजकारण्यांची भाऊगर्दी हा कायम वादाचा मुद्दा राहिला आहे. कराडच्या संमेलनात यशवंतराव चव्हाण पहिल्या रांगेत रसिक म्हणून उपस्थित होते. इचलकरंजीच्या संमेलनात पु. ल. देशपांडे यांनी राजकीय व्यक्तींच्या वावराबद्दल पहिल्यांदा नापसंती व्यक्त केली होती. दर संमेलनात हा वाद होतो, आणि संमेलनात राजकारण्यांचा वावर असतोच.  
 
कोल्हापूर साहित्य संमेलन 
१९३२ साली कोल्हापुरात त्यावेळच्या आयर्विन म्युझियममध्ये (आत्ताचे कलेक्टर ऑफिस) झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाराजा सयाजीराव गायकवाड होते. ते येऊ न शकल्याने त्यांचे लिखित भाषण वाचून दाखवण्यात आले होते. याही संमेलनात काही वाद झाले होते. त्या काळातील ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वादाची किनार या संमेलनावर होती. “केसरी’, “राष्ट्रवीर’ या नियतकालिकातून या वादाचे पडसाद त्याकाळात सतत उमटत होते. आयोजक, साहित्यिक, वर्गरचना आणि संस्थानी वर्ग यांच्यातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तणाव संमेलन काळात होता. प्रत्यक्ष संमेलनाचे अध्यक्ष सयाजीराव यांनी संमेलनाला येऊ नयेत, असे प्रयत्न झाले.
 
गेल्या तीस वर्षांत साहित्य संमेलनाचे स्वरूप आमुलाग्र बदलेले आहे. सरकारकडून संमेलनासाठी २५ लाख रूपये दिले जातात. प्रत्यक्षात संमेलनावर कोट्यवधीचा खर्च होतो. म्हणून महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी संमेलन साधेपणाने कमी खर्चात करण्याचा आग्रह धरला. त्यावरूनही वादाचे मोहोळ उठलेच.   
 
चिपळूण साहित्य संमेलन 
चिपळूण येथील साहित्य संमेलन मात्र अनेक वादांनी गाजले. परशुरामाचा परशु संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर छापावा की नाही असा एक वाद खूप गाजला. संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे की नाही, यावरही बराच खल झाला होता. परशुच्या मागणीवरून संभाजी ब्रिगेडने संमेलन उधळून लावण्याचा इशारा दिला होता. तर ठाकरे यांच्या नावाला पुष्पा भावे यांनी विरोध केला होता.
 
साहित्यिकांना म्हटले बैल 
१९९२ साली कोल्हापूरला झालेले ६५ वे साहित्य संमेलन खूप गाजले. त्यावेळी रमेश मंत्री व इंदिरा संत अध्यक्षपदाच्या निवडणुकीस उभे होते. त्यामध्ये रमेश मंत्री निवडून आले. रमेश मंत्री हे लेखक म्हणून कोणत्याच पिढीला माहीत नव्हते. मुंबईचे संमेलन बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यिकांना बैलाची उपमा दिल्यामुळे तसेच त्यावेळचे अध्यक्ष वसंत बापट यांनी त्यास दिलेल्या रोखठोक उत्तरामुळे गाजले होते.  कराडचे संमेलन आणीबाणीच्या सावटात झाले. प्रत्यक्ष यशवंतराव चव्हाण यांच्या गावात संमेलन असल्यामुळे ते दीर्घकाळ चर्चेत राहिले. खळबळजनक वक्तव्ये, मानापमान, रूसवे फुगवे व त्यास माध्यमांनी घातलेले खतपाणी, यामुळे संमेलने नेहमी चर्चेत राहिली. काही संमेलनाध्यक्ष विमानाच्या खर्चासाठी अडून बसले, तर काही व्यासपीठावरील सन्मानासाठी, तर काहींनी चक्क अध्यक्ष झाल्यामुळे मोठ्या मानधनाची अपेक्षा व्यक्त करून त्याचा पाठपुरावा केला. अध्यक्षांना असलेले हे ग्लॅमर आता ओसरत चालले आहे. 
 
अध्यक्षांविना पार पडलेले संमेलन 
८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाबळेश्वर येथे झाले. अध्यक्ष म्हणून आनंद यादव यांची निवड झाली होती. समाजाच्या असहिष्णू वृत्तीमुळे हे संमेलन अध्यक्षाविना घेण्याची नामुष्की आयोजकांवर ओढवली. अध्यक्षांविना पार पडलेले एकमेव संमेलन अशी या संमेलनाची नोंद झाली. आनंद यादव यांनी त्यांच्या “संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीत तुकारामांचे विपर्यस्त चित्रण केल्याचा वाद याकाळात निर्माण झाला. कादंबरी आधीच प्रकाशित झाली होती. मात्र, लोक जणू काही यादव अध्यक्ष होण्याची वाट पाहत असावेत. यावरून खूप गदारोळ झाला. आनंद यादव यांनी माफी मागितली. प्रकाशकांनी कादंबरी मागे घेतली. एवढ्यावर लोकांचे समाधान झाले नाही. त्यांनी संमेलन उधळून लावण्याची भाषा कायम ठेवल्याने आनंद यादव यांना राजीनामा द्यावा लागला.  
 
बातम्या आणखी आहेत...