आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेनवर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर जमावाचा रुग्णालयावर हल्ला; धामणगाव रेल्वेची घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. अशोक सकलेचा यांच्या रुग्णालयासमोर गोळा झालेला जमाव. - Divya Marathi
डॉ. अशोक सकलेचा यांच्या रुग्णालयासमोर गोळा झालेला जमाव.
धामणगाव रेल्वे- किरकोळ दुखापत झाल्याने उपचारासाठी आलेल्या दोन वर्षाच्या मुलीचा अवघ्या दोन तासातच उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या हजारो नागरिकांनी येथील शास्त्री चौकातील डॉ. अशोक सकलेचा यांच्या अभिषेक रुग्णालयाची तोडफोड केली. ही घटना बुधवारी नोव्हेंबरला दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान संतप्त जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीमार करण्यात आला. जमावाने डॉ. सकलेचा यांची कार दुचाकीही पेटवून दिली. जमावाच्या संतापाचा उद्रेक वाढल्याने डॉ. अशोक सकलेचा पत्नी डॉ. सारिका सकलेचा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

कावली येथील दिगांबरराव हिवसे यांची मुलगी सोनाली प्रशांत ठाकरे रा. मांडगाव, ता. समुद्रपूर दिवाळीनिमित्त ओवाळणीसाठी मुलगी निधी प्रशांत ठाकरे (वय दोन) हिच्यासह आली होती. दरम्यान निधीच्या पायावर खलबत्ता पडल्याने तिला ताप आला होता. त्यामुळे सोनाली ठाकरे त्यांच्या भावाने बुधवारी नोव्हेंबरला दहा वाजताच्या सुमारास निधीला उपचारासाठी शास्त्री चौकातील डॉ. अशोक सकलेचा यांच्या अभिषेक रुग्णालयात आणले. दरम्यान उपचार सुरू झाल्यानंतर डॉ. सकलेचा यांनी निधीला दोन इंजेक्शन दिले. त्यानंतर लावलेल्या सलाईनमधून पाच ते सहा इंजेक्शन दिल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. परंतु तास-दीड तासातच निधीची प्रकृती सातत्याने ढासळत असल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी डॉ. सकलेचा यांना विचारणा केली. त्यावेळी डॉ. सकलेचा यांनी आधी पंधराशे रुपये जमा करा मुलगी काही वेळाने शुद्धीवर येईल, असे सांगितले. 

मात्र रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या दीड-दोन तासातच निधी बेशुद्ध पडली तिच्या तोंडातून फेस गळण्यास सुरवात झाली. त्यानंतर मात्र डॉ. सकलेचा यांनी निधीला नागपूर येथे हलवावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर मात्र लगेच निधीचा मृत्यू झाला. त्यानंतर घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच हजारो नागरिक रुग्णालय परिसरात जमा झाले. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने रुग्णालयात तोडफोड सुरू केली. जमाव नियंत्रणाबाहेर जात असल्याचे निदर्शनास येत असल्याचे पाहून तळेगाव दशासर, कुऱ्हा मंगरूळ दस्तगीर येथील पोलिसांना पाचारण करण्यात आले. परंतु त्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून रॅपिड अॅक्शन फोर्सची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. घटनेचे गांभीर्य पाहून जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनाशकुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. जमावाने डॉ. सकलेचा यांची कार, दुचाकी जाळली. चार तास शास्त्री चौकातील तणाव कायम होता. यावेळी बाजारपेठ बंद होती. रात्री आठ वाजताच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात निधीच्या पार्थिवाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. 
 
तीन जणांचा जीव गेला : धामणगाव रेल्वे येथे उपचारासाठी अद्यावत सोय नाही. त्यामुळे बहुतांश रुग्ण डॉ. सकलेचा यांच्या रुग्णालयात उपचारासाठी येतात. यापूर्वीही या रुग्णालयात तीन जणांचा संशयास्पद मृत्यू झाला. मंगरूळ येथील सागर हुमने या युवकाचा ओव्हरडोजमुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्यावेळी नातेवाईकांनी केला होता. शहरातील मुख्याध्यापकाचाही ओव्हरडोजमुळे मृत्यू झाल्याची चर्चा नागरिक करीत होते. 
 
डॉक्टर सकलेचा दाम्पत्याला पोलिसांनी घेतले ताब्यात : घटनास्थळी तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी डॉ. अशोक सकलेचा पत्नी डॉ. सारिका सकलेचा यांना सुरक्षेच्या मुद्द्यावरून ताब्यात घेतले त्यांची रवानगी चांदूर रेल्वे येथे केली. 
 
भरारीपथकाला सापडली होती औषधी : म्हैसाळ येथील नवजात शिशू मृत्यूप्रकरणी शासनाने गठीत केलेल्या तालुका स्तरीय भरारी पथकाच्या तपासणीत अभिषेक रुग्णालयात विना परवानगी औषधे विकली जात असल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबत पोलिसांतही तक्रार केली होती. 
 
पीएसआय कुमरे यांनी दोन तास सांभाळला जमाव : पीएसआय अरविंद कुमरे हे घटनास्थळी पोहचले परिस्थिती हाताळून दोन तास त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मृतकाच्या नातेवाईकांच्या भावना समजून घेत चिडलेल्या गर्दीला कायदा हातात घेण्याचे आवाहन कुमरे करीत होते. शेवटी गर्दीला आवरणे कुमरे यांनाही अशक्य झाले. त्यामुळे जमावाच्या संतापाचा उद्रेक होऊन तोडफोड जाळपोळ सुरू झाली. 
 
घटनेची चौकशी सुरू 
निधीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. अद्याप पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नसून, दोन्ही पक्षाकडील बयाण नोंदवून चौकशी सुरू करण्यात आली आहे.  
- अशोक लांडे, ठाणेदार, दत्तापूर (धा.रे.) 
बातम्या आणखी आहेत...