आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"थ्रीडी'च्या माध्यमातूनच कुशल मनुष्यबळ निर्मिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जगवयोवृद्ध होत असताना भारत मात्र तरुणांचा देश बनत आहे.त्यामुळे जगाला कौशल्ययुक्त मनुष्यबळाची गरज भासणार असून, डेमोक्रसी (लोकशाही), डेमोग्राफी (लोकसंख्या) आणि डिमांड (मागणी) या "थ्रीडी' भारताच्या शक्ती असून उच्च तांत्रिक शिक्षण क्षेत्रात या तीन डीच्या साहाय्याने उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तंत्रशिक्षण संस्थाचालकांना केले.

कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करण्यास तंत्रशिक्षण संस्थांना अपयश येत असल्याने विकासाची दरी वाढत असल्याची खंत व्यक्त करून शासकीय अनुदान लाटणाऱ्या तंत्रशिक्षण संस्थांचे कान टोचत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कडक मूल्यांकनावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला. हव्याप्र मंडळाच्या प्रांगणात आयोजित ४५ व्या आयएसटीईच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी (९ जानेवारी)झाले.त्या वेळी ते बोलत होते.
सन २०२० मध्ये भारताचे सरासरी वय २९ वर्षे राहणार आहे. याउलट इतर देशांतील सरासरी वय ३१ ते ४५ पर्यंत असेल. त्यासाठी भारतासमोर जगाला मोठे मनुष्यबळ पुरवण्याची संधी प्राप्त झाली आहे. सन २०३५ पर्यंत आपण मनुष्यबळ कुशल करू शकलो नाही, तर आफ्रिकन देशाच्या हातात ही संधी जाईल,याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहणे हे गुंतवणुकीच्या दृष्टीने घातक आहे. राज्यात शासन एससी, एसटीच्या विद्यार्थ्यांचे १०० टक्के, तर ओबीसी विद्यार्थ्यांचे ५० टक्के शुल्क भरते. परंतु, राज्यातील काही महाविद्यालय केवळ याच प्रवर्गातील जागा भरल्याचे दिसून येते. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मिळणारे अनुदान लाटण्याचा प्रकार अाहे का? त्यामुळे महाविद्यालयाच्या मूल्यांकनाची शासनाकडे असलेली प्रक्रिया अधिक गतिशील, परिणामकारक कुशलतेकडे नेण्याची गरज आहे. त्याकरिता चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टिमचा (सीबीसीएस) अवलंब करण्याचे त्यांनी सुचवले.
सॉफ्टवेअरमध्ये भारत आघाडीवर आहे. परंतु, हार्डवेअर क्षेत्रात पुढे येण्याची गरज आहे.
गुंतवणूकदारांसाठी भारत हे आकर्षणाचे केंद्र असून, उद्योग क्षेत्र वाढीसाठी प्रशिक्षित सर्वोत्तम अभियांत्रिकी मनुष्यबळ घडवण्यासाठी विद्यापीठांनी अद्ययावत दर्जेदार अभ्यासक्रम तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, आयएसटीईचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, आयएसटीई दिल्लीचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. पी. काणे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर, व्हीएनआयटी नागपूरचे अध्यक्ष डॉ. विश्राम जामदार, डॉ. सागर देशपांडे, हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, ॲड. कृष्णराव देशपांडे, श्रीकांत चेंडके, माधुरी चेंडके, सागर देशपांडे, डॉ. इसामु कोयामा (जपान), डॉ. सीराम रामकृष्णा, हितोशी सातो (जपान) आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मंडळी उपस्थित होते. संचालन डॉ. किशोर फुले दीपा वैद्य यांनी केले, तर आभार अनंत मराठे यांनी मानले.

तीन देशांसोबत एमओयू
यावेळी हव्याप्र मंडळाने डेन्मार्क, जर्मनी जपान या तीन देशांसोबत विद्यार्थी कर्मचारी आदानप्रदानाचा सामंजस्य करार केला. तीस वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन महाराष्ट्रात विदर्भात होत असल्याचा गौरवोल्लेख पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी केला. हव्याप्र मंडळाने देशासाठी मानवतेसाठी सदैव अग्रेसर भूमिका घेतली आहे. शेतकरी समुपदेशन, हेल्पलाइनबाबत त्यांनी माहिती दिली.

आयएसटीईचे आठ लाख सदस्य
यावेळी अध्यक्षीय भाषणात आयएसटीईचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांनी आयएसटीई या संस्थेविषयी माहिती दिली. आयएसटीई ही संस्था साडेआठ लाख विद्यार्थी सदस्य असलेली उच्च तंत्रशिक्षणात जगात सर्वात मोठी संस्था असल्याचे त्यांनी सांगितले.

यांचा झाला गौरव
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आयएसटीई इंटरनॅशनल फेलोशिप प्राप्त केल्याबद्दल सीराम कृष्णन, डॉ. राजेंद्र गोडे इंस्टिट्यूटचे डॉ. विजय इंगोले यांना आयएसटीई फेलोशिप प्राप्त केल्याबद्दल, उच्च तंत्रशिक्षणाचे संचालक डॉ. सुभाष महाजन यांना बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.