आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगांना विजेच्या क्राॅस सबसिडीचा अधिभार रद्द, राज्यपालांना प्रस्ताव सादर : मुख्यमंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - विजेवरील क्रॉस सबसिडीचा अधिभार हटवून विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना स्वस्त दरात वीजपुरवठा करण्यासाठी राज्यपालांकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपुरात दिली. येत्या काळात उद्योगांच्या तपासण्यांचा त्रास कमी होणार असून स्वयंप्रमाणीकरण तसेच रँडम स्वरूपाच्या तपासण्या होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन व केंद्रीय पेट्रोलियम आणि रसायन मंत्रालयातर्फे ‘विदर्भात प्लास्टिक आणि केमिकल उद्योगाच्या संधी’ या विषयावरील परिसंवादात मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, रसायने व खते राज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम उपस्थित होते.

स्वस्त विजेमुळे मागास भागात उद्योग येण्यास चालना मिळेल, असा िवश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, अधिकाऱ्यांना तपासणी करता यावी म्हणून उद्योगाची माहिती अगदी वेळेवर संगणकावर कळविली जाईल. अहवाल ४८ तासांत अपलोड करण्याचे बंधन राहील. त्यामुळे गैरप्रकारांना आळा घालता येईल.

भविष्यात देशभरात लिथियम आयर्न बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून त्या दृष्टीने ऑटोमोबाइल उद्योग क्षेत्राने बदल घडवावे, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.