आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रपुरमध्ये धक्कादायक प्रकार; चक्क 112 शौचालयांची चोरी, महिलांची पोलिसांकडे तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर/चंद्रपूर- जिवती तालुक्यातील पाटण गावात चक्क शौचालयेच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल 112 शौचालये चोरीला गेली आहेत. याबाबत पाटण गावातील महिलांनी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे आणि आता प्रशासकीय यंत्रणेने चोरांचा शोध घेण्यासाठी धावाधाव सुरु केली आहे.
 
संपूर्णपणे हगणदारी मुक्त झालेले गाव 
चंद्रपुरातील जिवती या दुर्गम तालुक्यातील पाटण हे गाव संपूर्णपणे हगणदारी मुक्त झालेले गाव आहे. या हगणदारीमुक्तीसाठी 2016-2017 चा स्मार्ट ग्रामचा पुरस्कार देखील या गावाला मिळाला आहे. ग्रामपंचायतीने 2013-2014 साली घरी शौचालयाचे खड्डे खोदण्यास नागरिकांना सांगितले. नागरिकांनी त्याप्रमाणे ते खोदले देखील. सरकारकडून पैसे मिळतील आणि आपण शौचालायचे काम पूर्ण करू या आशेवर लोक 2 वर्षे थांबले. मात्र काहीच होत नसल्याचे पाहून एक दिवस लोकांनी पंचायत समितीचे कार्यालय गाठले. मात्र पंचायत समितीच्या कागदपत्रात पाटण हे पूर्ण गाव शौचालय योजनेसाठी अपात्र असल्याचे ऐकून त्यांना धक्काच बसला. कारण या गावातील प्रत्येक घरी शौचालय बांधले गेल्याची नोंद केली गेली होती.
 
प्रत्येक लाभार्थ्याला मिळाले अनुदान
कागदोपत्री प्रत्येक लाभार्थ्याला 5 हजार 100 रुपयांचे अनुदान देखील देण्यात आले होते. शौचालये बांधली गेली आहेत आणि दुसरीकडे शौचालयांचा पत्ता काही लागत नाही आहे. म्हणून या गावातील निरक्षर महिलांनी आता पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पाटण ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमत करत लाभार्थ्यांना अंधारात ठेऊन निधीचा अपहार केला आणि कागदोपत्री बांधण्यात आलेली शौचालये वापरात असल्याची प्रमाणपत्रेही वरिष्ठांना सादर केली असल्याची या प्रकरणात प्राथमिक माहिती आहे. मात्र शौचालय चोरीचा मुद्दा ऐरणीवर आल्याने चंद्रपूरचे जिल्हा प्रशासन हादरले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी स्वतः लक्ष घालत जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...