आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 दिवसांच्या पोलिस गस्तीने जिरली चोरट्यांची मस्ती, पोलिस आयुक्त स्त्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागील दोन ते तीन महिन्यांपासून शहरात चोरी घर फोडींचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मात्र ठाणे स्तरावर रात्रीच्या वेळी पोलिसांकडून प्रभावी गस्त होत नसल्यानेच चोरी, घरफोडीचे प्रमाण वाढले असल्याचे पोलिसांकडूनच मागील तीन दिवसांपासून सुरू झालेल्या गस्तीवरून पुढे आले आहे.
 
राठी नगरमध्ये एकाच रात्री चार बंगले फोडल्यानंतर पोलिस आयुक्त रात्र गस्तीसाठी रस्त्यावर उतरले. पोलिस आयुक्त पहाटेपर्यंत स्वत: रस्त्यावर असल्यामुळे आयुक्तालयातील इतर पोलिस अधिकारी कर्मचारी डोळ्यात तेल घालून गस्त घालत आहे. त्याचीच फलश्रुती मागील तीन दिवसांपासून शहरात एकही मोठी चोरी किंवा घरफोडी झाली नाही. याचाच अर्थ तीन दिवसांपूर्वी शहरात प्रभावी गस्त होत नव्हती, असे म्हणने वावगे ठरणार नसल्याचे मत पोलिस आयुक्त मंडलिक यांनी व्यक्त केले.
 
शहरातील चोरी घरफोडी रोखण्यासाठी दीड ते दोन महिन्यांपूर्वी प्रभावी गस्त करण्याबाबतच्या सूचना पोलिस आयुक्तांनी सर्व ठाणेदारांना दिल्या होत्या. तसेच विविध परिसरात जाऊन नागरिकांच्या भेटी घेऊन जास्तीत जास्त बैठका घेण्याचेही सुचवले होते. त्याचवेळी मनुष्यबळाची कमतरता असल्याची ओरड करणाऱ्या ठाण्यांसाठी अतिरिक्त मनुष्यबळ अतिरिक्त वाहनसुद्धा दिले होते. मात्र तरीही गस्तीमध्ये काही सुधारणा झाली नव्हती. चोऱ्या घरफोडीचे सत्र थांबण्याऐवजी उलट वाढले होते. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. अनेक भागांत नागरिक स्वत: हातात काठ्या घेऊन जागरण करत होते. चाेरी सत्रात सर्वाधिक फटका गाडगेनगर राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना बसला आहे.

कारण सर्वाधिक चोऱ्या याच दोन ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या आहेत. दरम्यान, २८ ऑक्टोबरला पहाटे गाडगेनगर ठाण्यापासून अगदी जवळ असलेल्या राठी नगरमध्ये एकाचवेळी तब्बल चार बंगले फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले. राठी नगर हा शहरातील उच्चभ्रू वस्तीपैकी एक आहे. राठी नगरात दोनच बंगल्यातून सात लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे पुढे आले. या चोऱ्या झाल्यानंतर मात्र पोलिस यंत्रणा खऱ्या अर्थाने जागी झाली आणि रात्र गस्तीसाठी पोलिस आयुक्तांपासून पोलिस शिपायापंर्यंत सर्व रस्त्यावर येण्याचे ठरले. त्यामुळेच २९ ऑक्टोबरला रात्रीपासून अख्खे पोलिस आयुक्तालय रस्त्यावर उतरले. त्या दिवसांपासून मात्र शहरात एकही मोठी चोरी झाली नाही. वास्तविकता ज्या पोलिसांनी मागील काळात गस्त घातली तेच पोलिस मागील तीन दिवसांपासून गस्त घालत आहे.
 
मात्र मागील तीन दिवसांपासून पोलिस आयुक्त स्वत: रस्त्यावर आहेत. तसेच त्यांनी सर्व ठाणेदार, ठाण्यातील पोलिस, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी यांना रस्त्यावर येण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे सर्वांनाच इमानदारीने गस्त घालावी लागत असल्याने चोऱ्या थांबल्या आहेत. याच प्रमाणे प्रभावी गस्त पूर्वी झाली असती, तर शहरातील अनेक चोऱ्या थांबल्या असत्या, पर्यायाने अमरावतीकरांना आर्थिक फटक्यापासून वाचवता आले असते. मागील काही महिन्यांपासून शहरात प्रभावी गस्त झाली नसल्याची बाब पुढे येत असल्याचे पोलिस आयुक्तांनीही मान्य केली आहे.
 
दरम्यान, शासनाने तीन वर्षांपूर्वी पोलिस आयुक्तालयात पोलिसांना गस्तीसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये किंमतीचे दहा चारचाकी वाहन दिले. या वाहनांत तीन ते चार पोलिस बसून गस्त घालण्यासाठी नेमलेले असतात. मात्र मागील तीन वर्षात सीआर व्हॅनच्या गस्तीने एकही चोरटा पकडल्याचे कुठेही नोंदीवर नाही. तसेच ही सीआर व्हॅन गल्ली बोळांमध्ये फिरवणे शक्य नाही. त्यामुळेच पोलिस आयुक्तांनी प्रत्येक ठाण्याच्या हद्दीत चार सायकल, तसेच चार दुचाकी सीआर व्हॅन, ठाणेदारांचे शासकीय वाहन, गुन्हे शाखेचे विविध पथक असा मोठा ताफा रात्रीच्या वेळी गस्तीवर आहे.
 
गस्त सुरूच राहणार
शहरात वाढलेल्या चोरी घरफोडीच्या घटनांनंतर नाईलाजास्तव आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले. प्रभावी उपाययोजना होत असल्यामुळे मागील तीन दिवसांत मोठी चोरी झाली नाही. त्यापूर्वी प्रभावी गस्त झाली नसल्याचे दिसून आले.
- दत्तात्रय मंडलिक, पोलिस आयुक्त.
 
सहा ठाणेदारांना सीपींनी बजावली ‘शो कॉज’
मागीलदोन महिन्यांपासून शहरात सुरू असलेल्या चोऱ्यानंतरही ठाणे स्तरावर योग्य उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे चोरटे पकडण्यात पोलिसांना अपेक्षित यश आले नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वीच पोलिस आयुक्तांनी आयुक्तालयातील राजापेठ, गाडगे नगर, बडनेरा, फ्रेजरपुरा, नागपुरी गेट आणि वलगाव ठाणेदारांना शोकॉज नोटीस बजावली होती. या नोटीसनंतर काही ठाण्यांच्या कामात सुधारणा झाली. मात्र, ज्या ठिकाणी सुधारणा झाली नाही, त्या ठाणेदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त मंडलिक यांनी गुरुवारी सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...