आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वासनी प्रकल्पामुळे होणार तीन तालुक्यांमध्ये हरित क्रांती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील वासनी बु. परिसरात नवीन प्रकल्प तयार होत आहे. पाण्याची गरज शेतीच्या पाण्याची निकड लक्षात घेता हा भाग सिंचनापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने अनुशेष कार्यक्रमांतर्गत वासनी मध्यम प्रकल्प हातात घेतला असल्याची माहिती उर्ध्व वर्धा प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता आर. पी . लांडेकर यांनी दिली.
सप्टेंबर २००८ मध्ये प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आलेल्या वासनी प्रकल्पाच्या कामाला २००७ मध्येच १०२.८१ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. २०.३५ मीटर उंची असलेल्या या धरणाची लांबी २१०० मीटर इतकी आहे. १२ बाय मीटरचे वक्राकार दरवाजे या धरणासाठी प्रस्तावित असून धरणाच्या सांडव्याची लांबी १४६ मीटर आहे. प्रकल्पाची पाणी साठा क्षमता २२.५९१ दलघमी असून यामुळे अचलपूर, दर्यापूर अंजनगाव या तालुक्यातील एकूण २२ गावातील ४,३१७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाचा पाणीसाठा हा मुख्यत्वे ४५६ हेक्टर क्षेत्रामध्ये होणार आहे. या प्रकल्पातील बुडीत क्षेत्र धरणाकरिता ५३१ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून १२९ हेक्टर जमीन सरळ खरेदीद्वारे संपादित करण्यात आली आहे. तर उर्वरित संपादन पुढील वर्षी होईल.

या प्रकल्पाच्या ठिकाणी धरण सांडवाच्या बांधकामाच्या ठिकाणी मऊ भूस्तर आहे. त्याकरिता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नवी दिल्ली येथील एका संस्थेकडून संकल्पना करून सांडव्याचे काम करण्यात आले आहे. या सांडव्याच्या पायथ्याच्या खाली ६० सेंमी रुंद १२३ मीटर लांब तसेच २० मीटर खोलीच्या तीन डायफ्रॉम वॉल घेण्यात आलेल्या आहे. अशा पद्धतीच्या सांडव्याचे बांधकाम असलेला या भागातील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पावर आजपावेतो ३३९.५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. उर्वरित काम भूसंपादनासाठी ७७.३० कोटी रुपयांची आवश्यकता आहेे.

या प्रकल्पामुळे बोरगाव पेठ-निजामपूर हा रस्ता बुडीत क्षेत्रात येत असून त्याला धरणाच्या बाहेरून वळवण्यात येत आहे. या पुलांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उर्वरित कामे जलसंपदा विभागामार्फत करण्यात येतील. या कामाकरिता अंदाजे ११. ३० कोटी रुपयांचा खर्च असून तो जलसंपदा विभागातर्फे करण्यात येईल. या सर्व कामासाठी ६७६. ६३ कोटींचा सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्ताव महामंडळास सादर केेला आहे.

या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील ४,३१७ हेक्टर जमीन ओलिताखाली येत असून त्याकरिता १४ किमी लांबीचा कालवा किंवा पाईप लाईनद्वारे सिंचन करण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे. त्यामुळे अचलपूर तालुक्यातील रावळगाव, दोनडा, सावळी खुर्द, चिंचखेड सावळी बु., येवता, शंकरपूर, वळगाव खुर्द, तिरमलपूर, असदपूर, रंगार वासणी, रायपूर, शहापूर, कोल्हा, नरसिंगपूर दर्यापूर तालुक्यातील बेंबळा बु., शिवरखेड, प्रल्हादपूर, सांगवा खुर्द अंजनगाव तालुक्यातील कजबेगव्हाण, साखरी, घोडसगाव या गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे.

जलसमृद्धीने परिसराचा विकास
^हा प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या वार रूममध्ये समाविष्ट असल्याने तसेच अनुशेषांतर्गत असल्यामुळे प्रकल्पाचे सनियंत्रण राज्यपाल मुख्यमंत्री यांचेकडून करण्यात येत आहे. शासनाच्या सिंचन धोरणानुसार या प्रकल्पावरील लाभधारकांनी पाणी वापर संस्था स्थापन करून पाणी हक्कदारीचा लाभ घेणे अपेक्षित आहे. याद्वारे शाश्वत पाण्याचा कोटा संरक्षित करून घनमापन पद्धतीने पाणी पुरवठा होऊ शकतो. पाणी वापर संस्थेमुळे वितरण प्रणाली योजनेवर पाणी वापर संस्थेचा अधिकारी राहणार आहे. शेतकऱ्यांना हवे ते पिके घेण्याची मुभा मिळणार आहे. आर. पी . लांडेकर, अधीक्षकअभियंता, उर्ध्व वर्धा प्रकल्प मंडळ, अमरावती.

तीन गावांचे होणार पुनर्वसन
या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात बोरगाव दोरी हे गाव पूर्णतः बोरगाव पेठ हे गाव अंशतः बाधित होत असून बोरगाव तळणी हे गाव पाण्याने पूर्ण वेढले जात असल्यामुळे पुनर्वसनासाठी प्रस्तावित करून त्याला शासनाची मंजुरी घेण्यात आलेली आहे. बोरगाव दोरी या गावाचे पुनर्वसन निजामपूर येथे करण्याचे प्रस्तावित आहे. बोरगाव तळणी या गावाचे पुनर्वसन परिसरातच करण्याचे प्रस्तावित असून बोरगाव पेठ या गावाच्या लगतच पुनर्वसन करण्याचा शासनाचा विचार आहे. तिन्ही गावाच्या पुनर्वसनाकरिता लागणाऱ्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया प्रगतीपथावर असून उर्वरित कामे पुढील वर्षी होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...