आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरभक्षक वाघिणीचे नरखेड तालुक्यातील जंगलात पलायन, वन विभागाला वाघिणीने दिला चकमा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड - मागील चार दिवसांपासून तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या वाघिणीचे लोकेशन मिळताच तिला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने सर्वतोपरी प्रयत्न केले. घोराड शिवारात वाघिणीच्या अस्तित्वामुळे दहशत निर्माण झाली होती. तिचे लोकेशन मिळताच वाघिणीला पकडण्यासाठी वन विभागाने सर्व प्रकारे प्रयत्न केले. मात्र वाघिणीने वन विभागाच्या हातावर तुरी देत नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्याकडे आपला मोर्चा वळवला असून दिंदरगाव शेत शिवारात बस्तान मांडल्याची माहिती वनविभागाचे सहायक वन परिक्षेत्र अधिकारी आर. जे. बोंडे यांनी दिली. 
 
तालुक्यातील शहापूर शेत शिवारातील कन्होत्री नवडे, लोणी येथील प्रमोद कुबडे यांचा गोरा घोराड येथील राजाराम डबरासे यांच्या कालवडीचा वाघिणीने फडशा पाडल्यानंतर सोमवारपासून वनविभाग वाघ नियंत्रकाची तीन पथके परिसरात तळ ठोकून वाघिणीचा शोध घेत होते. मात्र वाघिणीने पथकाला सतत गुंगारा दिला. दोन दिवसांपासून तालुक्यातील घोराड येथील लेंडी नाल्याच्या काटेरी झुडुपात असल्याचे लोकेशन वन विभागाला मिळाल्यानंतरही वनविभागाचे पथक वाघिणीला जेरबंद करण्यास अपयश ठरल्याने दहशतीखाली असलेल्या नागरिकांनी रोष व्यक्त केला. सद्यस्थितीत ती वाघीण जलालखेडा ते मोवाड मार्गावरील दिंदरगाव या शेत शिवारात असल्याची माहिती सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी बोंडे यांनी दिली. 

बुधवारी दिवसभर दोन हत्ती प्रोक्लेनची मदत घेत तपास मोहीम राबवण्यात आली. मात्र त्यात अपयश आल्याने दिंदरगाव येथे तरी वाघीण जेरबंद होईल काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. घोराडसह तालुक्यातील नागरिक आता दिंदरगाववासी वाघिणीच्या अस्तित्वाने भयभीत झाले आहेत. पथकामध्ये असलेल्या हैदराबाद येथील वाघ नियंत्रक पथकाचे प्रमुख नबाब शेख अली खान, बोरचे विभागीय फॉरेस्ट अधिकारी आर. के. चव्हाण, जिल्हा वन परिक्षेत्र अधिकारी प्रमोद पंचभाई, अमरावतीचे प्रवीण चव्हाण, जिल्हा वन परिक्षेत्र अधिकारी पी. डी. मसराम, सहायक वन परिक्षेत्र अधिकारी अशोक कविटकर, नरखेडचे वन परिक्षेत्र अधिकारी बोलके यांच्या मार्गदर्शनात शोध मोहीम सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...