आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • To Sell The Space By Creating Documents In Nagpur

नागपूरात पोलिस मुख्यालयाचीच जागा विकण्याचा प्रयत्न, ७ कोटींमध्ये सौदाही झाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - बनावट दस्तावेज तयार करून जागा विकण्याच्या फसवणुकीच्या घटना दररोज उजेडात येत असताना नागपुरात ग्रामीण पोलिस मुख्यालयाचीच जागा विकण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे, एका संस्थाचालकाने ग्रामीण मुख्यालयाच्या चार एकर जागेचा सौदा ७ कोटीमध्ये एका बिल्डरशी केला. पोलिस विभागाची जागा लांबवण्याचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागपूर पोलिसही अचंबित झाले आहेत.
डॉ. अब्दुल वकील अब्दुल मतीन सिद्दीकी असे आरोपीचे नाव आहे. महेष देवदत्त गुप्ता असे फिर्यादी बिल्डरचे नाव आहे. आरोपी डॉक्टर अब्दुल यांची एक मानव लोकायन महासंघ नावाची संस्था आहे. जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत मौजा इंदोरा येथे खसरा नं. ४०/२ मधील चार एकर मोकळी असलेली जागा शासकीय ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या मालकीची आहे, असे असताना आरोपीने ही जागा आपल्या संस्थेची असल्याचे कागदोपत्री दाखवून आणि ती आपल्या ताब्यात ठेवून बिल्डर गुप्ता यांच्यासोबत ७ कोटींत विकण्याचा २७ जानेवारीला सौदा केला. त्यानुसार करार करून अग्रीम म्हणून ७ लाख ७० हजार रुपये घेतले. त्यानंतर आरोपींने करारानुसार वेळोवेळी ३६ लाख रुपये घेतले. दरम्यान, फिर्यादी गुप्ता यांनी जमीन खरेदी करण्यापूर्वी रितसर मोजणी करण्यासाठी सिटी सर्वे कार्यालयाकडे अर्ज केला. मोजणीचे निर्धारीत शासकीय शुल्कही त्यांनी भरले. त्यानुसार सिटी सर्वे कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी कागदोपत्री मानव लोकायन महासंघाच्या मालकीची जागा मोजली असता ही चार एकर जागा ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या मालकीची असल्याचे समोर आले. सिटी सर्वेच्या अधिकाऱ्यांनी मोजणीअंती जमीनीची ‘क’ प्रत बिल्डर गुप्ता यांना दिली. सिटी सर्वे विभागाने दिलेली जमीनीची ‘क’ प्रत बघून आपली फसवणूक झाल्याचे गुप्ता यांच्या निदर्शनास येताच त्यांनी जरीपटका पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेताच याप्रकरणी मानव लोकायन महासंघाचे पदाधिकारी आरोपी डॉ. अब्दुल वकील अब्दुल मतीन सिद्दीकी व इतरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यासंदर्भात चौकशीअंती आरोपाला अटक करण्यात येईल, असे जरीपटका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांनी सांगितले.