आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठ्यांचा आज हुंकार,मोर्चा नियंत्रणासाठी राहणार १५०० पोलिसांचा बंदोबस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कोपर्डी येथील अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा आदी विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि. २२) शहरात मराठा मूक क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरात सुरू असलेल्या या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी होत असल्याने अंबानगरीतील हा मोर्चाही औत्सुक्याचा विषय ठरला आहे. मोर्चातील लाखोंची संभाव्य उपस्थिती गृहीत धरून प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असून, गुरुवारी शहरातील बहुतेक शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहराच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा म्हणून जिल्ह्याच्या उत्सुकतेचा विषय असलेला मराठा मूक क्रांती मोर्चा गुरुवारी सकाळी अकरा वाजता नेहरू मैदान येथून शिस्तीत निघणार अाहे. या मोर्च्यात जिल्ह्यातील पाच लाखांहून अधिक मराठा बांधव एकत्र येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शहरातील कोणकोणते रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार यासंदर्भातील नियोजन पोलिसांनी आधीच केले असून, यासंदर्भात माहितीही देण्यात आली आहे. वाहतूक सुरक्षेच्या नियोजनासाठी पोलिस मुख्यालयात बुधवारी सायंकाळी बैठक घेण्यात आली. त्यानुसार या मोर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी १५०० पोलिसांचा ताफा तैनात केला जाणार आहे.

कोपर्डी येथील घटना, अॅट्राॅसिटी कायद्यात सुधारणा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी काढल्या जाणाऱ्या मोर्चाची शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकात असलेल्या कार्यालयात नियोजन समितीद्वारे जय्यत तयारी करण्यात आली आहे.
सर्वपक्षातील मराठा नेते स्वयंस्फूर्तीने मोर्च्यात सहभागी होणार आहेत. नेहरू मैदानावरून सकाळी ११ वाजता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघणार आहे. मोर्च्यात सहभागी बांधवांना सूचना देण्यासाठी रस्त्यावर ध्वनीक्षेपक बसवण्यात आले असून मोर्चाचे नियंत्रण गर्ल्स हायस्कूल चौकातील नियोजन कक्षातून होणार आहे.

मूक क्रांती मोर्च्याबाबत विविध माध्यमांद्वारे शहरी सर्वदूर ग्रामीण भागात जोरात प्रचार करण्यात आला. त्याचप्रमाणे तालुकानिहाय नियोजन समित्या स्थापन करून तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत या मोर्च्याबाबत माहिती व्हावी समाजबांधवांनी महिलांसह या मोर्च्यात सहभागी व्हावे, या मुद्यावर जिल्हा आयोजन समितीने विशेष भर िदला आहे. सोबतच येताना स्वत:सोबत शिदोरी पाणी घेऊन यावे असे आवाहनही नियोजन समितीद्वारे करण्यात आले आहे. मूक क्रांती मोर्च्यात जिल्हाभरातून लखोच्या संख्येत मराठा बांधव एकवटणार असल्यामुळे हा मोर्चा शिस्तीत पार पडावा या उद्देशाने आयोजन समितीने सूक्ष्म नियोजन केले आहे. मोर्च्याच्या संचालनासाठी पार्किंग समिती, प्रचार समिती, झेंडा समिती, सुरक्षा समिती, तालुका समिती, शहर समिती, महाविद्यालय समिती, मोर्चा फलक समिती, व्हीडीओ फोटो समिती, जलव्यवस्थापन समिती, वाहतूक समिती, देणगी समिती, प्रवक्ता समिती, वैद्यकीय सेवा समिती, अर्थ समिती, कार्यालय समिती, कायदा समिती, आपत्ती व्यवस्थापन समिती अशा अनेक समित्यांमधून मराठा समाजातील मंडळी या मोर्च्याच्या शिस्तबद्ध शांतताबद्ध नियोजनासाठी गत तीन आठवड्यांपासून कार्यरत हाेत्या.

ज्याला जसे जमेल तसे मोर्च्यात होणार सहभागी : नेहरूमैदानाचे क्षेत्रफळ बघता या ठिकाणी सर्वच एकत्र येणे कठीण आहे. त्यामुळे मराठा समाज बांधव मोर्च्यात मार्गात जसे समेल तसे सहभागी होणार आहेत. गर्ल्स हायस्कूल चौकापर्यंत बहुतेक मोर्चेकरी सहभागी होतील.
जिल्हाभरातझाला जोरदार प्रचार : भित्तीपत्रके,स्टिकर, पोस्टर, फ्लेक्स, होर्डिंग्ज, केबल टीव्हीवरून माहिती, आकाशवाणीवरून आवाहन, चित्ररथामार्फत तसेच विविध माध्यमांद्वारे जिल्हाभरात मोर्चाचा जोरदार प्रचार करण्यात आला. त्यामुळे लाखोच्या संख्येत बांधव सहभागी होतील, अशी अपेक्षा नियोजन समितीला आहे.

बहुतेकशाळा, महाविद्यालयांना सुटी : यामोर्च्याबाबत संपूर्ण जिल्ह्यात कौतुहल असले तरी पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, ते त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या पाल्यांमुळे.सकाळी आठ वाजतापासूनच शहरातील मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार असल्यामुळे बहुतेक शाळा महाविद्यालयांनी सुटी घोषित केली अाहे. मात्र काही शाळांनी सायंकाळपर्यंत संभ्रम कायम ठेवला होता. त्यामुळे नेमके पाल्यांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत पालकांचे एकमत होत नव्हते. त्यामुळे शाळांमधील फोन खणखणत होते. शाळांना सुटीबाबत शिक्षण विभाग शासनाकडून निर्देश नसल्यामुळे शाळेतील कर्मचाऱ्यांना नेमके कोणते उत्तर द्यावे ते कळत नव्हते. काही शाळांनी तर तुमच्या जबाबदारीवर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू शकता, असे बेजबाबदार उत्तरही पालकांना दिले.

तीनमैदानांवर वाहन तळाची व्यवस्था : विशालक्रांती मूक मोर्च्यात सहभागी होण्यास जिल्ह्यातून येणारी वाहने ठेवण्यासाठी शहरात तीन वाहन तळांची सोय केली. बडनेरा मार्गावरून येणारी वाहने दसरा मैदानावर, मोर्शी, वलगांव, परतवाडा या मार्गावरून येणारी वाहने श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर तर काँग्रेसनगर,रुक्मिणीनगरकडून येणाऱ्या वाहनांना सायन्सकोर मैदानावर ठेवता येणार आहे.
अशीराहणार मोर्चाची रचना : मोर्चातआघाडीला तरुणी, त्यानंतर महिला, त्यानंतर जेष्ठ नागरिक, युवक, राजकीय नेते असा क्रम राहणार असल्याची माहिती समितीने िदली आहे.

Á शहर बस सेवा राहणार बंद
Á २५ टँकरद्वारे पुरवले जाणार पाणी
Á तात्पुरत्या प्रसाधनगृहांची शहरात केली जाणार व्यवस्था
Á स्वयंसेवकांसह हायड्रोलीक अाॅटोची व्यवस्था
Á नेहरू मैदानात माेबाइल टाॅयलेट
Á नेहरू मैदानाच्या दक्षिण पश्चिम प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांची नेमणूक
Á झोन स्तरावर दक्षता पथक
बातम्या आणखी आहेत...