आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात शिरून वृद्धाला राॅकेल टाकून जाळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चार महिन्यांपूर्वी गडगडेश्वर मंदिर परिसरात घडलेल्या विजय जाधव खून प्रकरणात सहभागी असलेल्या एका अारोपीच्या वडिलाला परिसरातच राहणाऱ्या आठ जणांनी घरात शिरून, अंगावर राॅकेल ओतून जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि. २९) मध्यरात्री माताखिडकी परिसरात घडली. किशोर विठ्ठलराव वाघमारे (६० रा. माताखिडकी, अमरावती) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी दोन महिलांसह आठ जणांना मंगळवारी (दि. १) अटक केली आहे. यामध्ये गोपाल मारुती जाधव (२७), किशोर मारुती जाधव (२६), राजेश मारुती जाधव (४४), दीपक मंगल जाधव (५०), संतोष भगवान जाधव (३५) आणि राहुल राजेश जाधव (२१) दोन महिलांचा समावेश आहे.

शहरातील माताखिडकी परिसरातील एका ३५ वर्षीय युवकाचा चार महिन्यांपूर्वी खून झाला हाेता. युवकाच्या खुनाच्या आरोपामध्ये परिसरातील सहा जणांना त्याच वेळी अटक करण्यात आली होती. यामध्ये किशाेर वाघमारे यांच्या मुलाचाही समावेश होता. या खुनाचा वचपा काढण्यासाठी सोमवारी मध्यरात्री सात ते आठ जण किशोर वाघमारे यांच्या घरात गेले त्यांनी अंगावर रॉकेल टाकून त्यांना जाळले. दरम्यान, वाघमारे यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी वाजून २० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र, तत्पूर्वी वाघमारे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, मध्यरात्री वरील आठ व्यक्ती घरात आले त्यांनी अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. वाघमारे यांनी दिलेल्या मृत्यूपूर्व जबाबात पोलिसांनी अटक केलेल्या आठही जणांचे नाव घेतले होते. त्या आधारे पोलिसांनी या आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना मंगळवारीच न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. हा खून जुन्या वादातून तसेच खुनाचा वचपा काढण्यासाठी झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे येत आहे. माताखिडकी परिसरात राहणाऱ्या जाधव परिसरातील काही व्यक्तींमध्ये मागील काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. या वादाची खरी सुरुवात मागील वर्षी मार्च महिन्यातच झाली. दरम्यान, १७ ऑक्टोबर २०१५ ला माताखिडकी परिसरातील विजय मारुती जाधव या युवकाचा गडगडेश्वर मंदिर परिसरात रात्रीच्या वेळी लोखंडी पाइप काठीने मारून खून झाला होता. या खुनाच्या आरोपात पोलिसांनी त्या वेळी गुन्हा दाखल करून दिगंबर किशोर वाघमारे, बजरंग रमेश अडायके, गोपाल प्रभाकर तायडे, अर्जुन जानराव इंगोले, सुरेश गुलाबराव स्वर्गे आणि विजय शंकर वाळसे या सहा जणांना अटक केली होती. या प्रकरणात राहुल राजेश जाधव हा तक्रारदार होता. सोमवारी रात्री वाघमारे यांच्या खून प्रकरणात राहुल जाधवविरुद्धही आरोप ठेवण्यात आल्यामुळे त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. विजय जाधवच्या मारेकऱ्यांमध्ये दिगंबर वाघमारेचा समावेश असल्यामुळे विजय जाधवच्या भाऊ, पुतण्या नातेवाइकांनी सोमवारी रात्री दिगंबरच्या वडिलांना जाळून मारले, असा आरोप करण्यात येत आहे. विजय जाधवच्या खुनाचा वचपा काढण्यासाठीच सोमवारी रात्री किशोर वाघमारेंचा जाळून खून झाल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आठ जणांना अटक
सोमवारी मध्यरात्री किशोर वाघमारे यांना जळालेल्या अवस्थेत इर्विनमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. तत्पूर्वी त्यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करून आठही जणांना अटक केली आहे. चार महिन्यांपूर्वी विजय जाधवचा खून झाला होता. त्या खुनाचा वचपा म्हणूनच ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सतीश चिंचकर, ठाणेदार,खोलापुरी गेट.

एका वर्षात चार वेळा दोन गट आमनेसामने
जाधवआणि त्याच भागात राहणारा अन्य एका गटामध्ये मार्च २०१५ पासून संघर्ष सुरू आहे. या दोन गटात मार्च २०१५ मध्ये वाद झाला होता. त्यानंतर १६ ऑक्टोबरला विजय जाधव याच्यासोबत विरुद्ध गटातील एका व्यक्तीची हाणामारी झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी विजय जाधवचा खून झाला.या खून प्रकरणात सहा जण अजूनही कारागृहातच शिक्षा भोगत आहेत.