आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ: भरधाव ट्रॅक्टर उलटल्याने तीन मजुरांचा घटना स्थळीच मृत्यू, मृतकांत दोन सख्खे भाऊ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घाटंजी- विद्युत विभागाचे सिमेंटचे खांब घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाल्याने तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, १४ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील पारवा ते पिपळखुटी मार्गावर घडली. प्रशांत पुंजाराम चौधरी वय ३४ रा. वाढोणा, हनुमंत पुनाजी येडमे वय २९ आणि पांडुरंग पुनाजी येडमे वय २५ हे दोघे भाऊ रा. टिपेश्वर यांचा मृत्यू झाला.
 
पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, घाटंजी तालुक्यातील पारवा - पिपळखुटी मार्गाने आज विद्युत विभागाचे सिमेंटचे खांब घेऊन जात असलेला भरधाव ट्रॅक्टर क्रमांक एमएच २९ एडी ८६९५ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. या वेळी ट्रॅक्टरमधील सिमेंटचे खांब अंगावर पडल्याने प्रशांत चौधरी, हनुमंत येडमे आणि पांडुरंग येडमे या तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पारवा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 

दरम्यान, पंचनामा करून मृतदेह पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठवले. या प्रकरणाचा तपास पारव्याचे ठाणेदार राऊत यांच्या मार्गदर्शनात जमादार बंडेवार करत आहेत. या अपघातातील एकाच घरातील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 
बातम्या आणखी आहेत...