आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रकने दोन युवकांना चिरडले, महामार्गावर सावर्डीनजीक घडला विचित्र अपघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने येणाऱ्या एका टाटा सुमो वाहनाचे चाक पंक्चर झाले. त्यामुळे चालक वाहनातील दोघे चाक बदलवत होते तर उर्वरीत दोघे मागून येणाऱ्या वाहनांना इशारा करत होते. याच दरम्यान मागून अालेल्या एका ट्रकने चाक बदलवणाऱ्या दोघांसह टाटा सुमोला सुमारे ५० फुट चिरडत नेले. यामध्ये दोन्ही युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा विचित्र अपघात अमरावतीपासून २० किलोमीटर अंतरावरील सावर्डी गावाजवळ बुधवारी (दि. १) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडला. 
 
सूरजलाल मांगू मावस्कर (३२) आणि देविदास उंबाजी येवले (२६ रा. माेगर्दा ता. धारणी) अशी मृतकांची नावे आहेत. 
 
देविदास येवले यांचे वडील उंबाजी येवले यांची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे देविदास हे त्यांना दीपक पाटील यांच्या टाटा सुमोने ३१ जानेवारीला नागपूरला घेऊन गेले होते. यावेळी देविदास यांचा मित्र सूरजलाल मावसकर अन्य चार नातेवाईक सोबत होते. उपचार करून बुधवारी रात्री वाजताच्या सुमारास ही मंडळी टाटा सुमोनेच मोगर्दाला परत येण्यासाठी निघाली. दरम्यान नागपूरवरून अमरावतीला येत असताना सावर्डी गावाजवळच्या पुलाजवळ टाटा सुमोचे चालक बाजूचे समोरील चाक पंक्चर झाले होते. त्यामुळे उंबाजी येवले वगळता सुमोतील पाचही जण खाली उतरले होते. यावेळी सुमोचे चालक दीपक पाटील हे चाक बदलवत होते, तसेच सुरजलाल देविदास त्यांना सहकार्य करत होते तर उर्वरीत दोघे मागून येणाऱ्या वाहनांना मोबाईलच्या उजेडाव्दारे ईशारा करून वाहन वळवण्याचा संकेत देत होते. 
 
याचदरम्यान नागपूरवरुन अमरावतीच्या दिशेने कोंबडीचे खाद्य घेवून येणाऱ्या ट्रकने (जीजे १२ एझेड ९८३८) भरधाव गतीने टाटा सुमोसह त्याठिकाणी उभे असलेले सुरजलाल देविदास यांना तब्बल ५० फुट फरफटत नेले. यावेळी सुरजलाल देविदास यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. इतर चौघांना मात्र दुखापत झाली नाही. अपघातानंतर या ट्रकचा चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. 

अपघाताची माहीती मिळताच नांदगाव पेठचे पोलिस घटनास्थळी रवाना झाले होते. त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह अमरावतीला आणले. या प्रकरणात दिपक पाटील यांच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुरूवारी दोन्ही मृतदेहावर इर्विनमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर हे सुध्दा पोहचले होते. या अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरिक तसेच संबधितांनी इर्विनमध्ये गर्दी केली होती. दोन मित्रांचा मृत्यू झाल्याने मोगर्दा गावात शोककळा पसरली आहे. 
बातम्या आणखी आहेत...