अमरावती - जिल्ह्यातील तुरीच्या पीकावर मोठ्या प्रमाणात थंडीचा परिणाम झाल्याने दाण्याच्या आकारात कमालीची घट होवून दाण्यांचा आकार बारीक झाला आहे.
मागील दोन वर्षे सातत्याने तुरीचे दर तेजीत राहिल्याने यावर्षी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आंतरपिक म्हणून तुरीची पेरणी केली आहे. यावर्षी जिल्ह्यात लाख ३६ हजार ९७ एकरात तुरीची लागवड करण्यात आली आहे. खरीपातील सोयाबीन, मूग उडीदाचे उत्पादन होऊन मिळालेल्या अल्प भावामुळे शेतकऱ्यांची आर्थिक हिशेब जुळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आशा आता तुर, कापूस हरभरा या पीकावर आहे. परंतु तुरीचे दर सध्या हमीभावापेक्षाही कमी झाल्यामुळे तुर उत्पादन शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच तुरीच्या पीकावर थंडीचा दुष्परिणाम, उधळी किडीचाही मोठा परिणाम झाला आहे.
थंडीचा दुष्परिणाम झाल्यामुळे तुरीच्या दाण्यांचा आकार बारीक झाल्याने वजनात मोठी घट होणार आहे. त्यातच दर्जा चांगला नसल्यामुळे बाजारात आधीच कमी दर असताना त्यापेक्षाही कमी दर परिणाम झालेल्या तुरीला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन तुरीचा सध्या हंगाम सुरू झाला आहे. हलक्या शेतजमीनीतील तूर बाजारात विक्रीसाठी आली आहे.