आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूर सहाशे रुपयांनी घसरली, एफसीआयच्या खरेदीला शेतकऱ्यांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढल्याने मागील दहा दिवसांच्या तुलनेत कमाल दरात ५०० ते ६०० रुपयांची घसरण झाली. तुरीला गुरुवारी (दि. २१) कमाल ८,९००, तर किमान ७,८५० रुपये दर मिळाला. दरम्यान, एफसीआयच्या वतीने तुरीची चढ्या कमाल ८,९००, तर किमान ८,७०० रुपये दराने खरेदी करण्यात आली.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत चालू आठवड्यात तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दहा दिवसांपूर्वी तुरीला सरासरी कमाल ९,५०० रुपये दर मिळाला होता. दरम्यान, बाजारात आवक वाढल्याने खरेदीदारांनी तुरीचे भाव सरासरी ५०० ते ६०० रुपयांनी पाडून खरेदी केली. सध्या तुरीला तुलनेने समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी तुरीशिवाय काहीच नसल्याने बाजारात तुरीची आवक वाढली आहे. याचा फायदा घेत खरेदीदारांनी तुरीचे दर पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला.

दरम्यान, हरभऱ्याच्या दरातही घसरण झाली असून, हरभऱ्याला कमाल ४,३७१ तर किमान ४,२५० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला.

एफसीआयची खरेदी तेजीत : येथीलकृषी उत्पन्न बाजार समितीतील खुल्या बाजारात भारतीय खाद्य निगमच्या वतीने (एफसीआय) चढ्या दराने तुरीची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे बाजारात कमालीची स्पर्धा निर्माण झाली असून, आज एफसीआयच्या वतीने चढ्या दराने खरेदी करण्यात आली. खासगी खरेदीदारांनी किमान ७,८५०, तर कमाल ८,९०० रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केली. दरम्यान, एफसीआयच्या वतीने कमाल ८,९००, तर किमान ८,७०० रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केली. आतापर्यंत एफसीआयच्या वतीने हजार ३०७ क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. चांगले भाव मिळत असल्याने शेतकरी तूर विक्रीसाठी आणताच खरेदीदारांनी अचानक भाव पाडले आहेत.

दर्यापुरात आजपासून नाफेडची खरेदी
दर्यापूरबाजार समितीत उद्यापासून खुल्या बाजारात नाफेडच्या वतीने तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात येत आहे. बाजार समितीत एफसीआय नाफेड खरेदीसाठी उतरल्याने शेतकऱ्यांचा चांगला फायदा होत आहे. आतापर्यंत एफसीआय नाफेड खरेदीत उतरल्यामुळे खासगी खरेदीदारांची बाजार समित्यांमध्ये एकाधिकारशाही निर्माण झाली होती. एफसीआय नाफेडच्या खरेदीमुळे बाजारात स्पर्धा निर्माण शेतकऱ्यांना चांगले दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एफसीआयच्या दरात तफावतही आढळते कमी
बाजार समितीत खासगी खरेदीदारांच्या वतीने खरेदी करण्यात येणाऱ्या तुरीच्या कमाल किमान भावात सुमारे १,५०० ते २,००० रुपयांच्या भावाची तफावत आढळून येत आहे. परंतु, एफसीआयच्या वतीने खरेदी करण्यात येत असलेल्या तुरीच्या कमाल किमान दरात केवळ २०० रुपयांचा फरक असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल एफसीआयच्या खरेदीकडे झुकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.