आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजप- काँग्रेसमध्ये रस्सीखेच: अमरावती महानगरपालिका (महाकाैल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागील २० वर्षांत अमरावती महापालिकेच्या सत्तेत ठाण मांडून बसलेल्या कॉंग्रेसच्या  काळातील कथित गैरव्यवहारांचा पुनरुच्चार करीत व पारदर्शी कारभाराचा नारा देत भाजपने त्यांच्याकडून सत्ता हस्तगत करण्यासाठी युद्धपातळीवर माेहीम चालवली अाहे.  तर राज्यातील सत्तेच्या बळावर विकासाचे दावे करणारा भाजपच्या ‘अच्छे दिन’च्या घोषवाक्याची चिरफाड करीत कॉंग्रेसनेही जशास तसे उत्तर देत त्यांना जाेरदार प्रत्युत्तर देणे सुरू केले अाहे. दुसरीकडे, शिवसेनेने मात्र ‘एकला चलाे रे’ची भूमिका घेत संयमी प्रचारावर भर दिलेला दिसताे.   

मागील तीन वर्षांत शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये माेठ्या प्रमाणावर फाटाफूट झाल्याने शहराच्या राजकारणातून राष्ट्रवादी जणू हद्दपार झाल्याचेच चित्र आहे. मागील निवडणुकांच्या तुलनेत मुस्लिमबहुल प्रभागात यंदा मुस्लिम लीग, समाजवादी पार्टी यांच्यासोबत ‘एमआयएम’ या नव्या राजकीय पक्षाने चांगलीच मुसंडी मारली आहे. 

राणा दांपत्याकडूनही तगडे अाव्हान
नगर परिषद निवडणुकीदरम्यान खासदार ओवेसी यांच्या जाहीर सभेने मुस्लिमबहुल प्रभागात एमआयएमला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत अाहे. या व्यतिरिक्त बहुजन समाज पार्टी, रिपाइं (आठवले गट), रिपाइं (गवई गट), भारिप बहुजन महासंघ, सीपीएम, सीपीआय हे पक्ष सुद्धा महापालिकेच्या रिंगणात उतरले आहे. राष्ट्रवादीकडून  लोकसभेची निवडणूक लढविलेल्या नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती रवी राणा या दांपत्याने  युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार उभे करून भाजप, कॉंग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.  
 
सर्वपक्षीय नेत्यांचे ‘दल’बदल  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय असलेले अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांना भाजपने महापालिका निवडणुकीचे प्रभारी केले अाहे. तर दोन वर्षांपूर्वी जनविकास कॉंंग्रेसमधून भाजपत आलेल्या आमदार सुनील देशमुख यांच्याकडे निवडणुकीची मुख्य जबाबदारी साेपवण्यात अाली अाहे. संपूर्ण राजकीय  कारकीर्द कॉंग्रेसमध्ये घालविलेल्या देशमुख यांनी मागील महापालिका निवडणुकीत जनविकास कॉंग्रेस पक्षाची स्थापना करून सहा नगरसेवक निवडून आणले होते. विधानसभेच्या निवडणुकीपासून मात्र देशमुख भाजपत आहे. तर मागील निवडणुकीत १७ नगरसेवक निवडून आणलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय खोडके हे अाता कॉंंग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे मागील दोन वर्षांत राष्ट्रवादी कॉंग्रेसची चांगलीच वाताहत झाली आहे. यापूर्वी कॉंग्रेसमध्ये असलेले बाबा राठोड यांच्यावर सध्या शहर राष्ट्रवादीची भिस्त अवलंबून आहे. शिवसेनेनेची महानगरातील धुरा सुनील खराटे या युवा नेतृत्वावर सोपविण्यात आली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...