आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यभर साथीचे वचन घेत ‘त्या’ दोघी झाल्या जीवनसाथी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - अखेरपर्यंत एकमेकींची साथ न साेडण्याचे वचन देत डोंगरगडच्या (छत्तीसगड) प्रसिद्ध बम्लेश्वरी देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात ‘त्या’ दोघी विवाहबद्ध झाल्या. अाता नागपुरात एका भाड्याच्या घरात आता या दोघींनी नवरा-बायकोप्रमाणेच आपला संसार थाटला आहे.
समलैंगिक विवाहाला अद्याप कायद्याची मान्यता नसली तरी सोबत राहण्याच्या त्यांच्या निर्धाराला पोलिसांचे पाठबळ लाभले आहे. पुरुषी कपड्यांमध्ये आणि केवळ मुलींमध्येच राहायला आवडणारी बॉबी (२३) आणि तिची जीवनसाथी बनलेलली प्रीती (२२) या दोघीही सर्वसामान्य कुटुंबातल्या. तीन वर्षांपूर्वी बॉबी काही कामाने शासकीय रुग्णालयात गेली हाेती. तेथे कामाला असलेल्या प्रीतीशी तिची ओळख झाली. दोघी चांगल्या मैत्रिणी झाल्या व काही काळातच त्यांचे प्रेमसंबंध जुळले. घरी जाणे-येणे सुरू झाले. त्यांच्या पालकांच्या दृष्टीने त्या जिवलग मैत्रिणी होत्या. त्यामुळे त्यांच्या नात्याचा कुणालाही संशय आला नाही.

प्रीतीच्या घरच्यांनी तिच्यासाठी वरसंशोधन सुरू केले. मात्र, प्रीतीने प्रत्येक मुलास नकार देणे सुरू ठेवले. त्याच वेळी तुझ्याशिवाय जगण्याची वेळ आल्यास मृत्यूला कवटाळेन, असे प्रीतीने बॉबीला सांगून टाकले. त्यामुळे दोघींनी घरून पळून जाण्याचा निर्णय घेतला. चार महिन्यांपूर्वी दोघी जबलपूरला (मध्य प्रदेश) पळून गेल्या. तिथे त्या महिनाभर पती-पत्नीप्रमाणे सोबत राहिल्या. मात्र, पैसे संपल्याने आता काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाल्याने नाइलाजाने नागपुरात परतल्या. घरच्यांनी दोघींवर आगपाखड केली. समजावल्यानंतर दोघीही पुन्हा आपापल्या घरी नांदू लागल्या. मात्र, त्या मोबाइल फोनच्या माध्यमातून संपर्कात होत्या. प्रीतीच्या घरच्या लोकांनी तिच्या लग्नासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले. मात्र, तिने मुलांना नाकारणे सुरू ठेवल्यावर घरच्यांनी तिला घरी कोंडून ठेवणे सुरू केले. त्याही परिस्थितीत बॉबी तिला भेटायला घरी येतच होती. दोघींनी घरून निघून जाण्याचा निर्णय घेतला.

पाेलिसांकडून मिळाले संरक्षण
कुटुंबीयांचा विराेध असल्याने प्रीती व बाॅबी यांनी पाेलिसांत जाऊन संरक्षणासाठी अर्ज दाखल केला. दोघी सज्ञान असल्याने पोलिसांनी त्यांना पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दोघी बॉबीच्या घरी एकत्र राहू लागल्या. बॉबीच्या पालकांनी त्यांना फारसा विरोध केला नाही. मात्र, प्रीतीच्या पालकांनी तिला जबरदस्तीने घरी नेण्याचे प्रयत्न केल्यावर दोघींनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांचे पालक ठाण्यात पोहोचल्यावर दोघींनी पोलिसांच्या समक्ष आम्ही एकमेकांवर प्रेम करतो व सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. या वेळी प्रीतीच्या पालकांनी बराच गोंधळ घातला, पण पोलिसांनी त्यांना समजावून परत पाठवले. यानंतर त्या पुन्हा बॉबीच्या घरी एकत्र राहू लागल्या. तीन दिवसांपूर्वीच त्यांनी एकमेकींना जीवनसाथी स्वीकारले.
बातम्या आणखी आहेत...