शेगाव - ‘सत्तेत असूनही अाम्ही शेतकऱ्यांसाठी लढत अालाे अाहाेत, यापुढेही लढत राहू. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला अाहे, मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्यास राज्यात राजकीय भूकंप अटळ अाहे,’ असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गुरुवारी फडणवीस सरकारला दिला. शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्यांना शेतकऱ्यांनी चांगलीच अद्दल घडवली. शेतमालाला हमी भाव देणाऱ्या सरकारचीही काही ‘हमी’ नाही, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
शिवसेनेच्या मेळाव्यानिमित्त शेगावात अालेल्या ठाकरे यांनी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला व नंतर मेळाव्याला मार्गदर्शन केले. दाेन्ही ठिकाणी त्यांनी भाजप सरकारवर टीकेची झाेड उठवली. ‘कर्जमुक्तीला फाटा देण्यासाठी मध्यावधी निवडणुकांची चर्चा घडवून अाणली जात अाहे. मात्र, मुख्यमंत्र्यांचा हा डाव अाम्ही कधीही यशस्वी हाेऊ देणार नाही. यांच्याकडे (भाजपकडे) भरपूर पैसा झाल्यामुळेच त्यांना मध्यावधी सुचत अाहे. एवढाच पैसा अाहे तर ताे शेतकऱ्यांना देऊन त्यांचा सातबारा काेरा करावा,’ असे अाव्हानही ठाकरेंनी दिले.
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या राजकीय भूकंपाबाबतच्या वक्तव्याचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, ‘दुष्काळात शिवसेना व शिवसैनिक नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले. कर्जाच्या अाेझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची लग्न शिवसेनेने सामुदायिक विवाह साेहळ्यात लावून हा प्रश्न साेडवला. केंद्र सरकारच्या नाेटाबंदीमुळे अनेक लाेक त्रस्त अाहेत. हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळायला हवी. ती न मिळाल्यास राज्यात राजकीय भूकंप अटळ अाहे,’ असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारला सुबुद्धीसाठी महाराजांना साकडे
कर्जमुक्तीच्या अगोदर शेतकऱ्यांना १० हजार रुपये पेरण्यांसाठी मिळाले पाहिजे ही ठाम भूमिका शिवसेनेने मांडून ती मान्य करून घेतली. अाता कर्जमाफीच्या घाेषणेची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला सुबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना अापण संत गजानन महाराजांकडे केली असल्याचे उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.