नागपूर- योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली समूहाच्या वतीने नागपुरात मिहान प्रकल्पात उभारण्यात येणाऱ्या फूडपार्कमुळे २० हजार स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होईल, तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता येतील, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी नागपुरात बोलताना केला.
गणेशोत्सवासाठी नागपुरात दाखल झाल्यावर निवासस्थानी प्रसार माध्यमांशी बोलताना गडकरी यांनी सांगितले की, ‘राज्यातील ८० टक्के वनक्षेत्र विदर्भात आहे. या वनक्षेत्रात औषधी वनस्पतींचा समावेश आहे. रामदेवबाबा यांच्या समूहाकडून राज्यातील वनौषधींची खरेदी केली जाणार असून त्यातून आयुर्वेदिक औषधांची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पातून किमान २० हजार युवकांना रोजगार अपेक्षित आहे.’ येत्या १० सप्टेंबर रोजी फूडपार्कचे नागपुरात भूमिपूजन होणार आहे. या वेळी गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतर मंत्रीही उपस्थित राहणार अाहेत.
नागपुरातील फूडपार्कमध्ये आयुर्वेदिक औषधांशिवाय अन्नप्रक्रिया युनिटही उभारले जाईल. त्यातील फळप्रक्रिया प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबवता येतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. रामदेवबाबा हे स्वदेशीचे अॅम्बेसेडर आहेत. विदेशी कंपन्या रॉयल्टीच्या माध्यमातून दरवर्षी ७० हजार कोटी रुपये देशातून नेत असतात. त्यांच्या प्रयत्नामुळे हा पैसा आपल्या देशात कायम ठेवण्याचे काम होत आहे, असे गडकरी म्हणाले.