आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ प्रकरणाची राज्यपालांकडे तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शारिरीक शिक्षण विभागातील विद्यार्थी प्रकरणात डॉ. एस. एन. बेहरा यांच्या विरोधात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे शनिवारी (दि.२३) तक्रार करण्यात आली. नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडिया (एनएसयुआय)ने पाठवलेल्या तक्रारीद्वारे डॉ. बेहरा यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. एस. एन. बेहरा यांच्या विरोधात विभागातील विद्यार्थ्यांनी बंड पुकारल्यानंतर एनएसयुआयने शुक्रवारी विद्यापीठावर धडक दिली. प्र-कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके यांना निवेदन देत विद्यार्थ्यांच्या समस्या विद्यापीठ प्रशसनाला कळविण्यात आल्याची माहिती राज्यपालांकडे करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विभागप्रमुखाच्या त्रासाला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल दोन आठवड्यांपासून वर्गात पाय देखील ठेवला नाही. विभाग प्रमुखांकडून केल्या जात असलेले मानसिक खच्चीकरण असभ्य वर्तणुकीविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. विभाग प्रमुख बदलण्यास विद्यापीठाने नकार दिल्यास प्रवेश रद्द करण्याचा इशारा विद्यार्थ्यांकडून देण्यात आला अाहे.
महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांनी एमएपीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेतले आहे. त्यांच्याकडून प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यास नुकतेच ‘अ’ श्रेणी प्राप्त झालेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची मोठी बदनामी होण्याची शक्यता आहे. शिवाय या प्रकरणाची स्थानिक फ्रेजरपूरा पोलिस ठाण्यात डॉ. एस. एन.बेहरा यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याचे नमूद करण्यात आले आहे. बहुसंख्य विद्यार्थी जम्मू काश्मीर येथील असून अल्पसंख्याक असल्याने या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेण्याची विनंती राज्यपालांना केली आहे.