अमरावती - अमेरिकेतील सॉल्टलेक सिटी येथे १८ ते २६ जूनदरम्यान होणाऱ्या विश्वचषक धनुर्विद्या स्पर्धेसाठी जाणाऱ्या तीन भारतीय खेळाडूंसह दोन अधिकाऱ्यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला आहे. व्हिसा नाकारलेल्यांमध्ये नांदेडच्या मृणाल हिवराळेंसह इशेबी देवी, सनतोंबा सिंग या तीन खेळाडूंसह सुखदेब महतो आणि प्रकाश राम या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. व्हिसा नाकारल्यानंतर भारतीय धनुर्विद्या संघटनेने दुसऱ्यांदा अर्ज केला. यजमान देशासह जागतिक धनुर्विद्या संघटनेनेही या प्रकरणी लक्ष घालावे, अशी विनंती केली. आॅलिम्पिकची तयारी अाणि सहभागाच्या दृष्टीने धनुर्धरांसाठी या स्पर्धेचे विशेष महत्त्व आहे. याबाबत उच्च स्तरावरून प्रयत्न सुरू केल्यानंतर अमेरिकेने ऐनवेळी अर्ज करण्यास सुचवले आहे.