आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: वनमाला संस्थेने पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी वाटले जलपात्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जलपात्रामुळे पक्ष्यांना पाणी मिळत आहे. - Divya Marathi
जलपात्रामुळे पक्ष्यांना पाणी मिळत आहे.
अमरावती - शहरातील वनमाला बहुउद्देशीय संस्थेने उन्हाळ्यात मनुष्याप्रमाणे पक्ष्यांनाही तहान लागते याची जाण ठेवत तसेच प्लॅस्टिक निर्मूलनाच्या उद्देशाने शहरात नि:शुल्क जलपात्र वाटून सर्वांपुढे स्तुत्य उदाहरण ठेवले आहे. 
 
वनमाला बहुउद्देशीय संस्थेसह आणखी दोन संस्था एकत्रितपणे काम करीत असून यांनी शहरात ज्या ठिकाणी जलपात्रे ठेवली आहेत ती रोज सुमारे ५० सदस्य सकाळी सायंकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा भरीत असतात. 
 
युवकांचा उपक्रम बघून अनेक मान्यवरांनी स्वत: त्यात सहभाग नोंदवला यात पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मनपा आयुक्त हेमंत पवार यांचाही समावेश आहे. 
 
या मान्यवरांनी स्वत: जलपात्र नेऊन पक्ष्यांसाठी ते दाणा पाण्याने भरून ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पक्ष्यांना जलपात्रातील पाणी मिळाले तर ते गार असते. एव्हाना बाजारात पक्ष्यांना दाणे पाणी देण्यासाठी प्लास्टिकपासून निर्मित घरटी भांडी आली आहेत. यातून अन्न पाणी घेणे पक्ष्यांसाठी घातक असून त्यातील पाणी हे गरम होते. याचे भान ठेवत मातीचे जलपात्र शहरात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले असून अगदी चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपासून कोणालाही पात्रात पाणी किंवा अन्न दिसले नाही तर ते स्वत: भरून ठेवत आहेत. यामुळे शहरात उन्हाळ्यातही सर्वत्र पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येत आहे. पक्ष्यांसोबतच झाडांवर राहणारे इतर लहान प्राणी जसे खारींनाही या पात्रांद्वारे अन्न पाणी मिळत आहे. काहींनी ही जलपात्रे त्यांच्या गॅलरीत तर काहींनी घरातील लहानशा बगिच्यात, परसात, झाडांवर ठेवली आहेत. विशेष बाब अशी की, संस्थेतील सदस्यांची पक्ष्यांबद्दल तळमळ बघून सर्वसामान्य नागरिकही या पात्रांना भरून ठेवण्यासाठी विशेष लक्ष देत आहेत. 
 
संस्थेच्या सदस्यांनी वाढदिवसाचे पैसे वाचवून खरेदी केले जलपात्र 
वनमाला बहुउद्देशीय संस्था, स्वराज्य प्रतिष्ठान साद फाऊंडेशनच्या सुमारे ५० सदस्यांनी वाढदिवस नेहमीच्या पद्धतीने साजरा करता त्यासाठी होणाऱ्या खर्चाचे पैसे एकत्रितपणे जमवून मध्य प्रदेशातून सुमारे हजाराच्या वर जलपात्र मागवले. या जलपात्रांना शहरातील विविध कार्यालये, उद्याने चौकात ठेवण्यात आले. युवकांची ही तळमळ बघून आता अमरावतीकरही या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी सरसावले असून अनेकजण स्वत: मागून जलपात्र नेत आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...