आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूग, उडीद, सोयाबीन पिकांवर यंदाही विविध रोगांचे आक्रमण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागील वर्षी येलो मोझॅक, व्हाईट फ्लाय खोडमाशीने जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील सोयाबीन, मुग, उडीद गारद झाल्यानंतर यावर्षीही या रोगांचा प्रादूर्भाव होण्याची दाट शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली अाहे. अंजनगाव सुर्जीसह इतर काही तालुक्यांमध्ये पेरण्या झालेल्या उडीद, सोयाबीन पिकांवर आतापासूनच या रोगांचे आक्रमण झाले अाहे. दरम्यान, कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्राने सुचविलेल्या उपाययोजना केल्यास ८० टक्के होणारे नुकसान वाचविण्यात मदत होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
येलो मोझॅक, व्हाईट फ्लाय खोडमाशी या रोगांच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक सोयाबीन, मुग उडीद गारद झाले होते. खोडमाशीमुळे गारद झालेल्या सोयाबीनची बहुतांश तालुक्यात शेतकऱ्यांनी कापणीही केली नव्हती. याचा जबर फटका शेतकऱ्यांना बसला होता. दरम्यान, मागील वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात जबर नुकसान सहन केल्यानंतर यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा कल उडीद पेरणीवर दिसून येत आहे. दरम्यान, अंजनगाव सुर्जी तालुक्यात उडदावर खोडमाशीचा प्रादूर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे.

रोगांची लक्षणे : संबंधितकीड पिकांवर पेरणीनंतर १५ ते २० दिवसांच्या आत दिसून येते. सोयाबीनच्या झाडाची एक दोन पाने पिवळी पडलेली दिसत असल्यास रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे समजावे. पिवळे पडलेले झाड मुळासकट उपटून बारकाईने त्याचे निरीक्षण केल्यास जमिनीपासून थोड्या अंतरावर खोडाच्या वरच्या भागाला बारीक छिद्र पडलेले दिसते.
खोडकिडीची प्राैढ माशी या छिद्रात अंडी घालते. तीन ते चार दिवसांत या अंडीतून अळ्या बाहेर पडतात. या अळ्या खोडांमधून आत घुसतात. यामुळे झाडाची वाढ थांबून पाने पिवळी पडतात. कीडग्रस्त झाडाच्या खोडाला उभा काप दिला असता झाडाच्या मुळापासून वरच्या भागात लालसर काळसर पट्टा दिसून येतो. त्यात बारीक अळ्या आढळून येतात.

अशी करा उपाययोजना : सोयाबीन,मुग, उडदाची पेरणी करताना सोबत एकरी चार िकलो फोरेट वापरावे. त्यानंतर खोडकिडीचा प्रादूर्भाव आढळून आल्यास त्वरित ट्रायझोफॉस ४० ईसी २५ मिली प्रति दहा लीटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी. दुसरी फवारणी पंधरा दिवसांच्या अंतराने क्लोरीनोप्रोली १८.५ ईसी मिली प्रति दहा लीटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी.खोडकीड दीर्घ कालावधीसाठी जमिनीच्या आतमध्ये सुप्तावस्थेत राहू शकते. पोषक वातावरण निर्माण झाल्यानंतर ही कीड जागृत होऊन रुद्रावतार धारण करते.

बीजप्रक्रिया, फवारणी आवश्यक
^यावर्षी ही सोयाबीन,मुग उडदावर रोगांचा प्रादूर्भाव होण्याची दाट शक्यता बळावली आहे. या किडींना आळा घालण्यासाठी बीजप्रक्रिया करून फवारणीत निंबोळी अर्क चिकट पिवळे सापळे पिकांत लावणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक उपाय केल्यास हा संभाव्य धोका टळू शकतो. प्रा.राजेंद्र जाणे, कीडरोग तज्ज्ञ.

प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता
^जिल्ह्यात यावर्षीही खोडमाशीच्या प्रादूर्भावाची शक्यता अधिक आहे. कृषी विज्ञान केंद्र कृषी विद्यापीठाने सुचविलेल्या वरील उपाययोजना केल्यास ८० टक्के पीक वाचविण्यात यश येऊ शकते. सध्या अंजनगाव सुर्जी तालुक्यात या रोगाचा प्रादूर्भाव झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत.शेतकऱ्यांनी संबंधित उपाययोजना करावी . अन्यथा यावर्षीही प्रचंड नुकसान होऊ शकते. डॉ.के. पी. सिंह, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण), केव्हीके, दुर्गापूर.
बातम्या आणखी आहेत...