आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाज्या कडाडल्याने खवय्यांच्या तोंडाला लगाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पावसाने दडी मारल्याने एकीकडे आवक कमी आणि ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला सडत असल्याने टमाटे, कोथिंबीर, फुलकोबी, पानकोबी, लसून, चवळीच्या शेंगांसह इतर भाज्यांचे भाव चांगलेच कडाडल्यामुळे आता खवय्यांना तोंडाला लगाम लावावा लागला आहे. 
 
भाज्यांचे भाव चिल्लर बाजारात कडाडल्यामुळे आधी ज्या भाज्या किलोभर खरेदी केल्या जायच्या त्या आता एक पाव किंवा अर्धा पाव खरेदी केल्या जात आहेत. भाज्यांना चव आणण्यासाठी टमाटे आणि कोथिंबिरीचा प्रामुख्याने वापर केला जातो. परंतु, टमाटे ८० रु. तर कोथींबीर १४० रु. किलो दराने मिळत असल्याने गृहिणींना नाईलाजाने इच्छेला आवर घालून दोन्ही चव आणणारे घटक पावभर, अर्धा पाव विकत घ्यावे लागत आहेत. ज्यावेळी आवश्यकता असेल त्याचवेळी याचा उपयोग करतोय असे खरेदीसाठी आलेल्या गृहिणी लिना कांडलकर, राठी यांनी सांगितले. सध्या पाऊस पुरेसा नसून सातत्याने ढगाळ वातावरण असल्यामुळे भाज्या सडत असतात. तसेच टमाटे, कोथिंबीर, फुलकोबी, पानकोबी, भेंडी या भाज्यांची आवक घटल्याने त्यांचे दर चिल्लर बाजारात नेहमीपेक्षा ते ४० रु.पर्यंत वाढले आहेत. टमाटे हे शेजारील राज्यामधून येत असल्यामुळे त्यांचे भाव चांगलेच वधारल्याची माहिती विक्रेत्याने दिली. 

भाज्यांचे दर (किलोमध्ये) 
टमाटे~८० 
फुलकोबी ~८० 
भेंडी ~६० 
चवळीच्या शेंगा ~८० 
पानकोबी ~६० 
कोथिंबीर ~१४० 
कारले ~६० 
लसून ~१२० 

कैऱ्या खरेदीवर जोर 
सध्या लोणचे टाकण्यासाठी बाजारात कैऱ्या खरेदीवर ग्राहकांचा विशेषत: गृहिणींचा चांगलाच जोर आहे. चांगल्या कैऱ्या फोडून ८० ते १२० रु. किलो दराने मिळत आहेत. याच कालावधीतील कैऱ्यांचे लोणचे चवदार आणि टिकाऊ असते असे मत खरेदीसाठी आलेल्या गृहिणींनी व्यक्त केले. 
 
बातम्या आणखी आहेत...