आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Soon G 5 Service In Amravati, BSNL's Mobile Revolution

अमरावतीत लवकरच ५-जी सेवा, बीएसएनएलची 'मोबाइल क्रांती'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - हाता हातात असलेला अॅन्ड्राॅइड मोबाइल, इंटरनेटवर उड्या मारणारी तरुणाई, माहितीच्या देवाणघेवाणीचा वेग आता तुफान वाढणार आहे. शहरात सध्या ३-जी सेवा मिळत असून, बीएसएनएलने थेट '५-जी' सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उंच उडी घेण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या काही महिन्यांत ही सेवा अमरावतीत सुरू होणार आहे. ही अमरावतीकर अॅन्ड्रॉइड मोबाइलधारकांसाठी सुखद बातमी आहे, अशी माहिती बीएसएनएलच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

अमरावती शहरासह सध्या संपूर्ण राज्यात ४-जी इंटरनेट सेवेची चर्चा सुरू आहे. मात्र, अमरावतीकरांना अजूनही प्रत्यक्षात ४-जी अनुभवयाला आलेले नाही. ३-जी पेक्षा ४-जी ची गती अधिक वेगवान आहे, असे मात्र एेकायला मिळत आहे. त्यामुळेच अमरावतीकरांना ४-जी ची उत्सुकता लागली आहे. दरम्यान '३-जी'नंतर '४-जी' सेवेच्या भानगडीत पडता बीएसएनएलने अमरावती शहरात थेट "५-जी' देण्याची तयारी सुरू केली आहे. बीएसएनएलने शहरात सात पॉइंट '५-जी'साठी शोधायला सुरुवात केली आहे. या पाच ठिकाणांवरून परिसरातील बीएसएनएल मोबाइल इंटरनेट किंवा इतर बीएसएनएल इंटरनेटधारकांना थेट '५-जी'ची सेवा वापरायला मिळणार आहे. ही सेवा हॉटस्पॉटच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. शहरात सुरुवातीला ज्या सात ठिकाणी ५-जी ची सेवा उपलब्ध होईल, त्या परिसरातील बीएसएनएल इंटरनेट मोबाइलधारकांना इंटरनेटच्या गतीचा तुफान आणि भन्नाट वेग अनुभवाला मिळणार आहे. ज्या ठिकाणी '५-जी' सेवा द्यायची आहे, त्या ठिकाणी एक डिव्हाइस लावण्यात आले, तर १०० मीटर परिसरात ही सुविधा मिळेल, डिव्हाइसेस लावले तर २०० मीटर, डिव्हाइस लावले तर ३०० मीटर अशाप्रकारे जितके डिव्हाइस लावले जातील त्याला गुणीला १०० मीटर परिसरात ही सेवा मिळेल.

शहरातील ज्या सात ठिकाणी बीएसएनएलला ५-जी ची सेवा सुरू करायची आहे, त्या ठिकाणांचा शोध सुरू झालेला आहे. त्यासाठी बीएसएनएल आणि बीएसएनएलला सेवा देणाऱ्या एका कंपनीद्वारे जागांचा शोध घेणे सुरू आहे. सध्या अमरावतीत '३-जी' असल्यामुळे अमरावतीकरांना त्यापेक्षा अधिक गतीचे इंटरनेट माहीतच नाही. दरम्यान, दिवसेंदिवस प्रत्येक ठिकाणी होत असलेले डिजिटलायझेशन, टेक्नोसॅव्ही झालेले मोबाइल युजर्स यांना बीएसएनएलच्या या सेवेमुळे आनंदाची पर्वणीच उपलब्ध होत आहे. देशात आग्रा येथील ताजमहाल परिसरातील वायफायला '५-जी' जोडले आहे तसेच मुंबईतील एका शासकीय कार्यालयाच्या इमारतीत ही सुविधा देण्यात आली असल्याचे बीएसएनएलच्या अधिकाऱ्याने 'दै. दिव्य मराठी'सोबत बोलताना सांगितले आहे.

बीएसएनएलला प्रायोगिक तत्त्वावर शहरात सात ठिकाणी '५-जी'ची सेवा पुरवायची आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या यंत्रणेकडून मागील काही दिवसांपूर्वी शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती विद्यापीठ, अमरावतीचे मॉडल रेल्वेस्थानक आणि गोपालनगर भागातील एक मॉल अशा चार ठिकाणी पत्र देऊन ५-जी ची सेवा घेण्याबाबत सुचवण्यात आले होते. मात्र, यातील एकाही ठिकाणाहून होकार आलेला नाही.

अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद हे गाव खासदार आनंदराव अडसूळ यांनी दत्तक घेतले आहे. दरम्यान, खासदार अडसूळ यांनी यावली शहीद या गावात '५-जी'ची सेवा देण्याबाबत बीएसएनएलला सुचवले होते. त्यामुळे यावलीमध्ये तीन डिव्हाइसद्वारे ही सुविधा देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील '५-जी' सेवा घेणारे पहिले गाव म्हणून यावली शहीद ठरणार आहे. यावली शहीद गावात डिव्हाइसेस लावण्यात येणार आहे. त्यामुळे यावली शहीद गावात तब्बल ३०० मीटर परिसरात '५-जी' सेवा उपलब्ध होईल.

२०१६ मध्ये बीएसएनएल '५-जी' देणार
अमरावती शहरात लवकरच आम्ही सात ठिकाणांवरून ५-जी सेवा सुरू करणार आहे. यासाठी जागा पाहणी सुरू असून, जागा निश्चिती लवकरच होईल. दरम्यान, आम्ही चार ठिकाणी याबाबत विचारणा केली, मात्र आम्हाला त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अमरावतीकरांनी पाठिंबा दिल्यास ही सेवा झपाट्याने कार्यान्वित होईल. २०१६ मध्ये ही सेवा अमरावतीकरांना पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. रामाश्रय प्रसाद, महाव्यवस्थापक,बीएसएनएल, अमरावती.