आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिमेशन परिषद: पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी विहिंप घेणार पुढाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- पर्यावरणपूरक शास्त्रमान्य अंत्यसंस्काराच्या दृष्टीने गोवरीच्या माध्यमातून अंत्यसंस्काराची पद्धत लागू व्हावी, जातीनिहाय स्मशानांची व्यवस्था मोडीत काढून सर्व जातींसाठी एकच स्मशानाची व्यवस्था असावी, हा अजेंडा घेऊन विश्व हिंदू परिषद आता देशपातळीवर प्रयत्न करणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मागील वर्षीच्या प्रतिनिधी सभेत एक गाव - एक पाणवठा -एक स्मशान अशी व्यवस्था निर्माण करण्यासंदर्भातील प्रस्ताव संमत करण्यात आला होता. आता त्या दिशेने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विश्व हिंदू परिषदेला देण्यात आली आहे. त्यापैकी अंत्यसंस्कार आणि स्मशानाचा विषय घेऊन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नागपुरात आणि एप्रिलदरम्यान राष्ट्रीय पातळीवरील क्रिमेशन कॉन्फरन्सचे आयोजन होणार असल्याची माहिती विहिंपचे केंद्रीय मंत्री िवदेश विभागाचे संयोजक प्रशांत हरताळकर यांनी दिली.

हरताळकर यांनी सांगितले, मृत्यू हा हिंदू धर्मातील १६ वा संस्कार आहे. मृत्यूबाबत समाजात अनेक गैरसमज भयदेखील आहे. स्मशानांबाबतही समाजात भय आढळून येते. ते घालवण्यासाठी काय करता येईल, याचाही विचार परिषदेत होणार आहे. वेदकाळापासून अंत्यसंस्काराच्या अनेक पद्धती असल्या तरी धर्मशास्त्रात लाकडाचा वापर करून दाहसंस्कार करण्याचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे कुठेतरी त्याचाही पुनर्विचार करून शास्त्रमान्य पर्यावरणपूरक अशा गोवरीच्या माध्यमातून अंत्यसंस्काराला चालना देता येईल काय, याचा विचार परिषदेत होणार आहे. आज देशात वर्षभरात ८० ते ८२ लाख दहनक्रिया होतात. त्यासाठी दीड कोटी झाडांची कत्तल होते. हे प्रमाण पाहिले तर एवढे वृक्षारोपण होते काय? असा प्रश्न सहज येतो. यात ऊर्जाबचतीचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. अंत्यविधीतून अनेकांना रोजगार मिळतो. स्मशानांचे सौदर्यीकरण हादेखील चर्चेचा विषय राहणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्हाला जातीव्यवस्था मान्य नाही, मग जातिनिहाय स्मशानांची व्यवस्था मोडीत निघावी, असा प्रयत्न आहे. त्यामुळे एक गाव - एक स्मशान या संकल्पनेवरदेखील चर्चा होणार आहे, अशी माहिती हरताळकर यांनी दिली.

अनेक धर्मगुरूही येणार
यापरिषदेत शास्त्रमान्य, पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार, जातीनिहाय स्मशान व्यवस्था मोडीत काढणे, स्मशानांचे अर्थकारण आणि धर्मशास्त्र, ऊर्जा बचत-संवर्धन अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. विश्व हिंदू परिषदेच्या राष्ट्रीय नेत्यांसह विविध विद्यापीठांचे कुलगुरू, वैज्ञानिक, तज्ज्ञ, बौद्ध, शीख, जैन धर्मगुरू प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेसह (नीरी) इतर काही संस्थांना सहभागी करण्याचा प्रयत्न असल्याचे हरताळकर म्हणाले.