आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भकन्यांची प्रेरक कथा डिस्कव्हरी चॅनलवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- मूळ अकोला जिल्ह्यातील आणि आता मुंबईत स्थायिक झालेल्या उद्योजिका कल्पना सरोज आणि भारतातील पहिल्या महिला अग्निशमन अभियंत्या नागपूरच्या हर्षिनी कान्हेकर यांची प्रेरक कथा येत्या सोमवारी व मंगळवारी रात्री ९ वाजता डिस्कव्हरी चॅनेलवरून प्रसारीत करण्यात येणार आहे. शनिवार व रविवारी त्याचे पुनर्प्रसारण करण्यात येणार आहे.

संकटांचा न डगमगता सामना करून या दोघींनी दृढ निश्चयाने वाटचाल करत आपले लक्ष्य गाठले. त्यांच्या जिद्दीची आणि संघर्षाची ही कथा ‘एचआरएक्स हीरोज विथ हृतिक रोशन’ या मालिकेत सादर होईल. नागपुरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील हर्षिनीचा प्रवास थरारक तितकाच प्रेरकही आहे. एनसीसीत असतानाच तिने फायर इंजिनिअर होण्याचे स्वप्न बाळगले. पुढे फायर सर्व्हीस कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यावर मुलगी असण्याच्या कोणत्याही सवलती न घेता तिने खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. आज यशस्वी उद्योजिका असलेल्या कल्पना सरोज यांचा प्रवास डोळ्यात पाणी आणतो. एका दलित कुटुंबात जन्मलेल्या कल्पना सरोज यांचे लग्न कमी वयात झाले. घरी प्रचंड गरीबी होती. पती मारहाण करायचा. सोबतीला फक्त वेदना होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत त्यांनी यशाचा मार्ग सुकर केला. २०१३ मध्ये त्यांना पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यात आले.