आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रदिनी सर्वत्र विदर्भाचा झेंडा फडकणार; विदर्भवाद्यांकडून आंदोलनाची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नागपूर - प्रत्येक जिल्ह्यात विदर्भाचा झेंडा फडकवून महाराष्ट्र दिनाचा निषेध नोंदवण्यासह विदर्भातील सर्व लोकप्रतिनिधींना हजारो दूरध्वनी करून भंडावून सोडण्यात येणार असल्याची घोषणा शनिवारी विदर्भवाद्यांनी नागपुरात केली.  

महाराष्ट्रदिनाला दरवर्षी विदर्भवाद्यांकडून विरोध करण्यात येतो. यावर्षी विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात विदर्भाच्या झेंडा फडकवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रदिनाचा निषेध म्हणून काळा झेंडादेखील फडकवला जाणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक माजी आमदार राम नेवले यांनी दिली. यानिमित्ताने विदर्भाचे आंदोलनही केले जाणार आहे, अशी माहिती देताना नेवले यांनी सांगितले की, महाराष्ट्र दिनाला विदर्भवादी विदर्भातील सर्व आमदार, खासदार, मंत्र्यांना फोन करून विदर्भ केव्हा देता, असा जाब विचारणार आहेत. या आंदोलनास “जवाब दो’ असे नाव देण्यात आले असून सर्व लोकप्रतिनिधींचे दूरध्वनी क्रमांक सोशल मीडियावर टाकण्यात येणार आहेत. हजारोंच्या संख्येने लोकप्रतिनिधींना दूरध्वनी जातील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने यंदा प्रथमच राज्यपालांना पत्र पाठवून विदर्भाच्या प्रश्नांवर आजवर काय-काय भूमिका मांडली, याची माहिती घेण्याचा प्रयत्न होणार असल्याचे डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी या वेळी बोलताना सांगितले. याशिवाय समितीच्या वतीने सर्व आमदार व खासदारांनाही पत्र पाठवून विदर्भ केव्हा देता, अशी विचारणा केली जाणार आहे.

रक्ताक्षरी आंदोलन : विदर्भ राज्य आघाडीच्या वतीने महाराष्ट्र दिनी पंतप्रधान मोदी यांना रक्ताने स्वाक्षरी केलेली हजारो पत्र पाठवली जाणार असल्याचे आघाडीच्या नेत्यांनी सांगितले. अक्षरश: हजारो पत्र जातील, अशी व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...