आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भ, मराठवाड्याची उद्या संयुक्त बैठक, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शेतीतून दुप्पट उत्पन्न घेणे ही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची संकल्पना अाहे. दुष्काळमुक्त खेडी निर्माण करणे ही मुख्यमंत्र्यांची संकल्पना आहे. या संकल्पनांना अनुसरूनच येत्या खरीप हंगातील पिकांसाठी पतपुरवठा, पीक नियोजन या विषयावार सखोल चर्चा करून कालबद्ध कार्यक्रम सरकार निश्चित करणार अाहे, अशी माहिती वसंतराव नाईक शेती स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली. मातीच्या आरोग्यानुसार पीक पद्धती व पाण्याचे नियोजन, शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी, आदिवासी विकास विभाग, पशु संवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विकासाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी ३ मार्च राेजी विदर्भ व मराठवाड्याची संयुक्त बैठक अमरावतीत घेतली जाणार अाहे.
राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यात कृषी विभाग व आदिवासी विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांचा कालबद्ध कार्यक्रम आखण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. किशाेर तिवारी अध्यक्षस्थानी राहतील. अतिरिक्त मुख्य सचिव कृषी, आदिवासी विकास सचिव, विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त, आदिवासी आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व कृषी सहसंचालक, अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक उपस्थित राहणार आहे.
मुख्यमंत्र्यांना अहवाल
या बैठकीत नियोजित कालबद्ध कार्यक्रम आणि शेती व्यवस्थेत उद््भवणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात येणार आहे. आत्महत्या रोखण्यासाठी सर्व विभाग सूचना करतील. योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारात, गरजू कुटुंबांना देण्यासाठी तसेच गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांकडे सादर केली जाईल, असे तिवारी म्हणाले.