आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भवाद्यांनी जाळले उद्धव व राज ठाकरे यांचे पोस्‍टर, मनसेने पत्रकार परिषद उधळल्‍याचे पडसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या विदर्भवाद्यांची मुंबईतील पत्रकार परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न मनसेने केल्यावर त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी बुधवारी नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत उमटले. विदर्भ राज्य आंदोलन समितीने मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा पुतळा जाळून निदर्शने केली. तसेच स्वतंत्र विदर्भाला विराेध करणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही पोस्टर जाळण्यात आल्याची माहिती समितीने दिली. दुसरीकडे, मनसेनेही विदर्भवाद्यांच्या विरोधात नागपुरात जाेरदार निदर्शने करत चंद्रपूरमध्ये वामनराव चटप यांच्या पुतळ्याचे दहन केले.
विदर्भाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यात धिंगाणा घालून ती उधळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांच्यासह नेत्यांनी पत्रपरिषद घेऊन विदर्भाच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले. या घटनेचे पडसाद बुधवारी नागपुरात उमटले. समितीच्या कार्यकर्त्यांनी नागपुरातील व्हरायटी चौकातील गांधी पुतळ्याजवळ एकत्र येऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा पुतळा जाळून संताप व्यक्त केला. या वेळी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या वेळी समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, नंदा पराते, युवक आघाडीचे दीपक मुंडे, दिलीप नरवाडिया, अरुण केदार, विदर्भ राज्य आघाडीचे संदेश सिंगलकर यांच्यासह विदर्भवीर जांबुवंतराव धोटे हेदेखील नंतर सहभागी झाले होते.
‘सर्वच राजकीय पक्षांनी विदर्भातील जनतेच्या संयमाची परीक्षा पाहू नये. स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन अतिशय संयम आणि शांततेने सुरू आहे. मात्र, विदर्भवाद्यांच्या वाटेला गेल्यास लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील, असा इशारा विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी दिला. ऑक्टोबर महिन्यात विदर्भाची प्रतिरूप विधानसभा भरविण्यात येणार असून डिसेंबर महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाला विरोध करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. दरम्यान, विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विदर्भातील अन्य काही जिल्ह्यांमध्येही मनसेच्या विरोधात आंदोलन करण्यात आल्याचा दावा समितीने केला आहे.

दरम्यान, विदर्भवाद्यांच्या विरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनीही हेमंत गडकरी आणि प्रवीण बरडे या नेत्यांच्या नेतृत्वात निदर्शने करून विदर्भवाद्यांचा निषेध केला. या वेळी कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. समितीच्या वतीने जाहीर केलेल्या वेगळ्या विदर्भाच्या नकाशाला कार्यकर्त्यांनी जाेडे मारत विदर्भवादी नेते वामनराव चटप यांच्या पुतळ्याची ताेडफाेड करून दहन केले. चंद्रपूर शहरातही असेच अांदाेलन झाले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, अाशिष देशमुखांचे राज ठाकरेंना अाव्हान ..
बातम्या आणखी आहेत...