आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारा जिल्ह्यातील गावकऱ्यांच्या सशस्त्र हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- गावकऱ्यांच्या हल्ल्यात बिबट्या ठार झाल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात गुरुवारी उघडकीस अाली.  लाखनी तालुक्यातील कोका अभयारण्यालगत असलेल्या रेंगेपार-कोठा या गावानजीक बिबट्याने सकाळच्या सुमारास गायीच्या वासराची शिकार केली. ही बाब कळताच गावकऱ्यांनी बिबट्याचा पाठलाग सुरू केला. जीव वाचवण्यासाठी ताे कालव्यालगत असलेल्या सिमेंट पाइपमध्ये घुसला. मात्र गावकऱ्यांनी  बिबट्याला बाहेर काढण्याकरिता पाइपच्या दुसऱ्या बाजूने कापडी चिंध्या जाळून आग लावली. या आगीमुळे बिबट्या जीव गुदमरून अर्धमेला झाला.
 
दरम्यान, तेथे पोहोचलेल्या वन कर्मचाऱ्यांनी त्याला ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने दोन वन कर्मचाऱ्यांना चावा घेतला. यामध्ये एकाच्या हाताला व दुसऱ्याच्या पायाला जखम झाली आहे. बिबट्या अर्धमेल्या अवस्थेत बाहेर येताच गावकऱ्यांनी लाठ्याकाठ्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. वन कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या तावडीतून बिबट्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र गावकऱ्यांनी बिबट्यावर लाठ्याकाठ्या  व कुऱ्हाडीने हल्ला चढवला. संतप्त गावकऱ्यांना रोखण्याचे वन कर्मचाऱ्यांचे सर्व प्रयत्न असफल ठरले. विशेष व्याघ्र संरक्षण दल व वनरक्षकांनाही गावकऱ्यांनी येऊ दिले नाही.
 
या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाला. लाखनी तालुक्याला लागून जंगलव्याप्त भाग असल्यामुळे उन्हाळ्यात  अनेक वेळा वन्यप्राणी पाणी तसेच भक्ष्याच्या शोधाकरिता गावाकडे येत असतात. हा बिबट्याही भक्ष्याच्या शोधात गावाकडे आला होता. मात्र तोच ‘शिकार’ झाला.  
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, बेपत्ता श्रीनिवास वाघाच्या बछड्याचा अखेर मृत्यू, अंगलट येईल म्हणून बापलेकांनी जमिनीत पुरले...
 
बातम्या आणखी आहेत...