आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षांचा कार्यकाळ तीन वर्षांचा हवा, अध्यक्षपदाचे उमेदवार घुमटकरांनी मांडली मते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - साहित्य संमेलनाध्यक्षाचा कार्यकाळ किमान तीन वर्षांचा हवा, अशी अपेक्षावजा मागणी डोंबिवली येथील ९० व्या नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जयप्रकाश घुमटकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केली. संमेलनाध्यक्षाला उणेपुरे एक वर्ष मिळते. त्यातील पहिले पाच-सहा महिने हार-तुरे आणि सत्कार स्वीकारण्यात जातात. उर्वरीत सहा महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र फिरणे शक्य नाही. शिवाय संमेलनाध्यक्षाने ठरवलेले उपक्रम राबवायलाही वेळ मिळत नाही. त्यामुळे संमेलनाध्यक्षाचा कालावधी तीन वर्षांचा असावा, असे घुमटकर म्हणाले.

अ. भा. साहित्य महामंडळाकडून संमेलनाध्यक्षाला एक लाखांचा निधी दिला जातो. हा िनधीही अपुरा आहे. तेव्हा हा निधी वाढवून तीन लाख करण्यात यावा, असे घुमटकर म्हणाले. ग्रामीण भागातील नवोदित कवी-लेखकांमध्ये कसदार लेखनाची क्षमता आहे. त्यांच्यामध्ये प्रचंड उर्जा आहे. परंतू संधी आणि व्यासपीठ न मिळाल्यामुळे त्यांच्यात नैराश्य आले आहे. त्यामुळे नवोदितांना संधी देण्याला आपले प्राधान्य राहिल, असे घुमटकर म्हणाले.

प्रत्येक जिल्हास्थानी एक पुस्तकांचे गाव असावे. तेथे सर्वांना उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध असावी. त्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढावी यासाठी आपले प्रयत्न राहिल, असे ते म्हणाले. प्रा. प्रवीण दवणे हे माझे वर्गमित्र होते. ठाण्यातील बेेडेकर महाविद्यालयात मी उपप्राचार्य असताना दवणे तेथे मराठी वाङमय मंडळाचे अध्यक्ष होते. आम्ही सोबत अध्यापनही केले आहे, असे घुमटकर म्हणाले.

घुमटकरांची साहित्य संपदा
नाटक, चित्रपट, सामाजिक, शैक्षणिक, राजकारण अशा विविध क्षेत्रांत घुमटकर यांची मुशाफिरी आहे. घुमटकर यांचे स्वत:चे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. ‘चित्रपट कसा काढावा’, ‘युगपुरुष डाॅ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘गोलघुमट’, ‘बुद्ध धम्माच्या वाटेवर’, ‘पानगळीची सळसळ’ ही घुमटकरांची प्रकाशित पुस्तके आहे. ‘तऱ्हेवाईक नातेवाईक’, ‘विचित्र विश्व’, जोतिबा’ व ‘प्रेेमासाठी वाट्टेल ते’ ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
बातम्या आणखी आहेत...