आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुड तालुक्यात सत्ताधारी भाजपाला बसला हादरा, काँग्रेसने मिळवले वर्चस्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनपेक्षितरीत्या जाहीर झालेल्या निकालाने वरुड, शेंदुरजनाघाटसह मोर्शी नगरपालिकेत एकहाती सत्ता भोगणाऱ्या भाजपाला चांगलाच हादरा बसला आहे. पंचायत समितीचे सभापती पद काँग्रेसने पदरात पाडून घेत सत्ताधारी पक्षाची धोबीपछाड केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने मागील पंचवार्षिक निवडणुकीत तीन जिल्हा परिषद सर्कलवर विजय मिळविला होता, तर आमदार बोंडे यांच्या नेतृत्वात विदर्भ जनसंग्रामने २ जागांवर विजय मिळविला होता, परंतु या वेळी आमदार अनिल बोंडे यांना जिल्हा परिषदेत तालुक्यातून एकाही उमेदवाराला निवडून आणता आले नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
 
भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बेनोडा  शहीद  सर्कलमध्ये  स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांनी भाजपाचे निळकंठ मुरूमकर यांचा ४ हजार मतांनी दणदणीत पराभव करत विजय मिळवला. तर पंचायत समितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिल्पा पवार यांना ३३९५, तर राष्ट्रवादीच्या सुषमा पेलागडे यांना २२०० मते मिळाली. त्याच वेळी मात्र भाजपच्या जयश्री गोहाड यांना केवळ १५८७ मतांवर समाधान मानावे लागले. टेंभुरखेडा गटातून भाजपाच्या ललिता लांडगे यांनी काँग्रेसच्या सुनंदा रामटेके यांचा १८८५ मतांनी पराभव केला. पुसला गटातून काँग्रेसचे चंद्रशेखर अळसपुरे यांनी भाजपाचे राजु भागवतकर यांचा २४०५ मतांनी पराभव केला. 

सातनुर गटामधून भाजपाच्या चैताली ठाकरे यांनी राकाँच्या मोनाली वडस्कर यांचा ४२८ मतांनी पराभव केला. लोणी गटातून  राकाँचे राजु पापडकर यांनी भाजपाचे रुपेश मदने यांचा २०८ मतांनी पराभव केला. मांगरूळी पंचायत समिती गटातून काँग्रेसचे तुषार निकम यांनी भाजपाचे विजय यावले यांचा १५८४ मतांनी पराभव केला. जरुड पंचायत समिती गटातून भाजपाच्या अंजली तुमराम यांनी राष्ट्रवादीच्या वर्षा फुसे यांचा ९७८ मतांनी पराभव केला. राजुरा बाजार गटातून काँग्रेसच्या सिंधु करनाके यांनी भाजपाच्या दशरथ परतेती यांचा १२५२ मतांनी पराभव केला. आमनेरमध्ये कॉँग्रेसचे विक्रम ठाकरे यांनी भाजपाचे देवेंद्र बोंदरे यांंना पराभवाची धूळ चारली, तर वाठोडामधून राष्ट्रवादीच्या गिरीजा धुर्वे यांनी भाजपाच्या तारावंती कोकाटे यांचा पराभव करीत विजयश्री मिळवली. 

पंसवर काँग्रेसचे वर्चस्व
पंचायत समितीसाठी झालेल्या पुसला, सातनूर, बेनाडा शहीद, टेंभूरखेडा, लोणी, मांगरुळी, जरुड, आमनेर, राजुराबाजार व वाठोडा सर्कलमधून पंचायत समितीच्या १० जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या ४, राष्ट्रवादीच्या २ व भाजपाच्या ३ व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १ जागा निवडुण आल्यामुळे पंचायत समितीवर काँग्रेसचा वर्चस्व राहणार आहे.

जि. प. पंचायत समितीत स्वाभिमानीचेे खाते
जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये स्वाभिमानी शेेतकरी संघटनेने पहिल्यादांच आपले खाते उघडले असून बेनोडा जिल्हा परिषदेत देवेंद्र भुयार व पंचायत समितीत शिल्पा पवार हे विजयी झाले आहेत. त्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष दिसून येत आहे. तर निवडणूक निकालवेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला हाेता.
बातम्या आणखी आहेत...